सावंतवाडी :हिरा कुठेही असला तरी त्याची चमक लपून राहत नाही, हे निरवडे गावचे युवक आणि ग्रामपंचायत सदस्य जयराम आत्माराम जाधव यांनी आपल्या निस्वार्थ समाजसेवेतून सिद्ध केले आहे. ग्रामीण भागातून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण आणि मानवतावादी क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांची ‘सिंधुदुर्ग जिल्हा युवा पुरस्कारा’साठी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे निरवडे गावासह संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जयराम जाधव यांनी आरोग्य शिबिरे, रक्तदान जनजागृती, औषधे व जीवनावश्यक साहित्याचे वाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणे, वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान यांसारख्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. ग्रामपंचायत सदस्य म्हणून गावाच्या विकासात मोलाचे योगदान देतानाच त्यांनी सामाजिक बांधिलकी जपणारा तरुण लोकप्रतिनिधी म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. केवळ पद भूषवणे नव्हे, तर आपल्या कार्यातून त्या पदाची प्रतिष्ठा वाढवणे हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले आहे.
संघर्ष, संस्कार आणि समाजासाठी समर्पित वृत्ती यातूनच खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्त्व घडते, याचे जयराम जाधव हे उत्तम उदाहरण आहेत. युवकांनी समाजासाठी पुढे यावे आणि गरजूंच्या मदतीला धावून जावे या भावनेने त्यांची समाजसेवा निरंतर सुरू आहे. त्यांच्या या यशामुळे निरवडे गावाला एक कर्तृत्ववान आणि चमकता हिरा लाभल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत असून, त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल निरवडे गावासह विविध क्षेत्रांतून त्यांचे कौतुक व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.












