ज्योतिबा मंदिराच्या जतन व संवर्धन कामादरम्यान स्ट्रक्चरल ब्रेकरचा वापर…

नागरिक व शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट…

प्रतिनिधी/ रोहन कांबळे

कोल्हापूर: ऐतिहासिक श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिराच्या (वाडी रत्नागिरी) जतन व संवर्धन कामादरम्यान स्ट्रक्चरल ब्रेकरचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या चुकीच्या पद्धतीने सुरू असलेल्या कामामुळे जुन्या आणि ऐतिहासिक वास्तूच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर चिंता व्यक्त होत असून नागरिक व शिवप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे.

संवर्धनाच्या नावाखाली महादेव मंदिराचा कळस उतरवून तिथे मोठ्या यांत्रिक बेकरचा वापर केला जात आहे.या प्रकारामुळे मंदिराच्या प्राचीन वास्तूला आणि महादेवाच्या पिंडीला मोठे हादरे बसत असल्याचा खळबळजनक दावा येथील सकल मराठा हिंदू समाजाने केला आहे.

सकल हिंदू समाजाच्या प्रतिनिधींनी आज सकाळी प्रत्यक्ष जाऊन कामाची पाहणी केली असता महादेव मंदिराचा कळस उतरवून त्याठिकाणी मोठ्या ब्रेकरचा वापर केला जात असल्याचे चित्र दिसून आले.

विशेष म्हणजे वर्क ऑर्डर मध्ये ब्रेकरचा वापर करण्याची परवानगी आहे का?असे ठेकेदाराला विचारले असता ठेकेदाराने अशा प्रकारची परवानगी नाही आणि ब्रेकरमुळे मंदिराला हादरे बसू शकतात अशी कबुलीच ठेकदाराने दिली.

मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू असून ब्रेकरचे हादरे थेट महादेवाच्या पिंडीपर्यंत येतात असे मंदिरातील पुरोहितांनी सांगितले.या गंभीर प्रकारामुळे सकल हिंदू समाजाने थेट पोलिसांशी संपर्क साधत ब्रेकर जप्त करण्याची मागणी केली. पण जिल्हाधिकारी यांची परवानगी मिळाल्याशिवाय ब्रेकर जप्त करता येणार नाही असे पोलिसांनी सांगितले.त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना होण्याची वाट प्रशासन बघत आहे का?असा संतप्त सवाल सकल हिंदू समाजाने केला आहे.