तिरंग्याचा सन्मान, देशाचा अभिमान; रस्ता सुरक्षा प्रत्येकाची जबाबदारी

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्गच्या वतीने कुडाळात रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली

कुडाळ : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘हर घर तिरंगा’ अभियान आणि रस्ता सुरक्षा जनजागृतीचा संदेश देण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने कुडाळ येथे रस्ता सुरक्षा जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या रॅलीत चालक-मालक, मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे प्रतिनिधी, विविध अभिकरणांचे प्रतिनिधी तसेच नागरिक,युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

 

यावेळी मार्गदर्शन करताना विजय काळे यांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान, तिरंग्याचे पावित्र्य आणि राष्ट्राभिमान जपण्याबरोबरच वाहन चालविताना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची राष्ट्रीय व सामाजिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन केले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोटार वाहन निरीक्षक वसंत कलंबरकर यांनी केले. स्वातंत्र्य दिन, राष्ट्राभिमान आणि रस्ता सुरक्षा यांचा मेळ साधत त्यांनी उपस्थितांमध्ये जनजागृती केली. विविध घोषणांमधून त्यांनी कार्यक्रमात राष्ट्रप्रेमाची ऊर्जा निर्माण केली.

 

‘तिरंग्याचा सन्मान—देशाचा अभिमान! रस्ता सुरक्षा—प्रत्येकाची जबाबदारी!’ या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

 

रॅलीची सुरुवात एस.टी. स्टँड येथून झाली. पोलीस स्टेशन, कुडाळ स्कूल, तहसील कार्यालय, एस. एन. देसाई चौक, आर.एस.एन. हॉटेलमार्गे रॅली एस.टी. डेपो ग्राउंड येथे पोहोचली. तेथे रॅलीची सांगता करण्यात आली.

 

सांगता कार्यक्रमावेळी नागरिकांना विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रस्ता सुरक्षा शपथ देण्यात आली. नागरिकांसाठी स्वयंस्फूर्तीने अल्पोपहार व फलाहाराची व्यवस्था करण्यात आली होती. प्रकाश गावडे यांनी विविध तालुक्यांतून आलेल्या नागरिकांसाठी फलाहार, अनंता शेळके यांनी पिण्याचे पाणी, तर शैलेश काळप यांनी नाश्त्याची व्यवस्था केली.

 

यावेळी नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर, सुरक्षित वाहनचालकाची जबाबदारी, अपघात टाळण्यासाठी आवश्यक दक्षता तसेच राष्ट्रध्वजाचा सन्मान करण्याचे आवाहन करण्यात आले.

 

कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मोटार वाहन निरीक्षक सूरज कुमार जाधव, संकेत सोमणाचे, योगेश खैरनार, पराग मातोंडकर, अमित नाईकवाडे, अमित पाटील, सिद्धार्थ ओव्हाळ, लडगे, पद्माकर माने, मितेश माने यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. बाबू तळेकर, उमेश हळदकर, संतोष धुमाळे, अभय सामंत तसेच अन्य स्वयंसेवकांनीही सहकार्य केले.

 

राष्ट्राभिमान, सामाजिक बांधिलकी आणि सुरक्षित भारताचा संदेश देत ‘तिरंग्याचा सन्मान—देशाचा अभिमान; रस्ता सुरक्षा—प्रत्येकाची जबाबदारी!’ या घोषणेसह रॅलीची उत्साहपूर्ण सांगता झाली.