ओबीसींची जातनिहाय जनगणना होणार; मागणीला अखेर यश

सुनिल भोगटे, समिल जळवी यांनी केंद्र शासनाचे मानले आभार

कुडाळ:ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, या मागणीला अखेर यश मिळाले आहे. केंद्र शासनाने जनगणनेच्या प्रश्नावलीत ओबीसी समाजाची जातनिहाय माहिती घेण्याचा निर्णय घेतल्याने ओबीसी समाजाच्या वतीने ओबीसी नेते तथा वैशवाणी समाजाचे जिल्हाध्यक्ष सुनिल भोगटे आणि भंडारी युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष समिल जळवी यांनी केंद्र शासनाचे आभार मानले आहेत.

यापूर्वी जनगणना सुरू झाल्यानंतर सुनिल भोगटे व समिल जळवी यांनी जनगणनेचे स्वागत करताना जातनिहाय जनगणना होणे आवश्यक असल्याची भूमिका मांडली होती. यासाठी त्यांनी तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच शासनाच्या विविध स्तरांवर पत्रव्यवहार करून निवेदने सादर केली होती. तसेच पत्रकार परिषदांच्या माध्यमातून ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्याची आग्रही मागणी केली होती.

आता केंद्र शासनाने तयार केलेल्या जनगणना प्रश्नावलीमध्ये ओबीसी समाजाशी संबंधित मुद्द्याचा समावेश करण्यात आल्याने ही ओबीसी समाजासाठी आनंदाची आणि महत्त्वाची बाब असल्याचे भोगटे व जळवी यांनी म्हटले आहे.

जातनिहाय जनगणनेमुळे ओबीसी समाजाची अचूक लोकसंख्या व सामाजिक स्थिती समोर येण्यास मदत होईल. त्यानुसार शासनाला विविध योजना व धोरणे अधिक सुसूत्रपणे आखता येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दीर्घकाळ केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.