वैभववाडी l प्रतिनिधी : वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने भुईबावडा घाटमार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः बंद झाला आहे. या मार्गावरील कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक करुळ घाटाने वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.
शनिवारपासून तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. रविवारी पहाटे भुईबावडा घाटातील डोंगरकड्यावरील मोठमोठे दगड रस्त्यावर कोसळले. त्यामुळे रस्ता पूर्णपणे माती व दगडांनी व्यापून गेला होता. परिणामी या मार्गावरून चारचाकी वाहनांची वाहतूक करणेही शक्य नसल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.
जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावर कोसळलेली दरड व दगड बाजूला हटविण्याचे काम सुरू असून, मार्ग वाहतुकीसाठी सुरळीत करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. दरड हटविल्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, घाटमार्ग बंद झाल्याने प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.













