भाट्ये येथील दर्गा स्टॉप जवळील तिहेरी अपघात प्रकरणी बस चालकावर गुन्हा

रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरानजीकच्या भाट्ये येथील दर्गा स्टॉप जवळ शनिवार 15 ऑगस्ट रोजी सकाळी 7.15 वा.सुमारास दोन एसटींची समोरसमोर धडक होउन अपघात झाला. अपघातात तब्बल दोन्ही एसटीमधील चालक,वाहक व प्रवासी मिळून एकूण22 जण किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
याप्रकरणी एसटी चालक राजेंद्र शामराव कांबळे (39,रा.एसटी बस डेपो राजापूर,रत्‍नागिरी) याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्‍याच्या विरोधात दुसऱ्या एसटीवरील चालक काशिनाथ भिकाजी भोसले (45,रा.गोळप धोपटवाडी,रत्‍नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्‍यानुसार, शनिवारी सकाळी ते आपल्या ताब्यातील एसटी (एमएच-14-बीटी-2236) घेउन रत्‍नागिरी ते पावस असे जात होते. त्‍याच सुमारास राजेंद्र कांबळे हा आपल्या ताब्यातील एसटी (एमएच- 40- एन- 9742) भरधाव वेगाने घेउन पावस ते रत्‍नागिरी जात होता. या दोन्ही एसटी भाट्ये येथील दर्गा स्टॉपजवळील वळणावर आल्या असता राजेंद्र कांबळेचा आपल्या एसटीवरील ताबा सूटला आणि त्‍याने रस्त्‍याच्या विरुध्द दिशेला जात समोरुन येणाऱ्या एसटीला धडक देत अपघात केला. तसेच या अपघातामुळे मागून येणाऱ्या एका क्रेटा गाडीचेही नुकसान झाले असून दोन्ही एसटीमधील प्रवाशी चालक,वाहक व प्रवाशांना लहान-मोठ्या दुखापत झाल्या आहेत. अपघातप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.