६० गुणवंत विद्यार्थी, ११० आजी-माजी सैनिक, पोलिस कर्मचारी व वीरपत्नींचा सन्मान
सावंतवाडी: प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत कारिवडेच्या वतीने गावात भव्य गुणगौरव व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी गावातील गुणवंत विद्यार्थी, आजी-माजी सैनिक, कार्यरत व निवृत्त पोलिस कर्मचारी तसेच वीरपत्नींचा जाहीर सत्कार करून गौरव करण्यात आला.
विविध क्षेत्रांत विशेष प्राविण्य मिळविलेल्या कारिवडे येथील जिल्हा परिषद शाळेतील ६० गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी गुणगौरव करण्यात आला. तसेच देशसेवा आणि राज्यसेवेत योगदान देणाऱ्या गावातील आजी-माजी सैनिक, कार्यरत व निवृत्त पोलिस कर्मचारी आणि वीरपत्नी मिळून सुमारे ११० जणांचा सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला सैनिक नागरी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना गुणवंत विद्यार्थ्यांसह देशसेवेत योगदान देणाऱ्या सैनिक व पोलिस बांधवांच्या कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्य प्राजक्ता केळुसकर, कारिवडेच्या सरपंच आरती अशोक माळकर, उपसरपंच महेश गावकर, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम आमुणेकर, प्रतिभा जाधव, तन्वी साईल, भाग्यश्री भारमल, नेहा परब, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष शंकर मेस्त्री, भाजपा आंबोली मंडळाचे उपाध्यक्ष अशोक माळकर, माजी सरपंच तानाजी साईल, माजी सैनिक आत्माराम साईल, लक्ष्मण सावंत, संजय सावंत, लक्ष्मण गवळी, कारिवडे सोसायटीचे चेअरमन महादेव माळकर, व्हाईस चेअरमन रविंद्र ठाकुर, संचालक सोनु सावंत, ग्रामपंचायत अधिकारी भरत बुंदे, कारिवडेचे पोलिस पाटील प्रदीप केळुसकर, भैरववाडीच्या पोलिस पाटील श्रुती सिद्धेश गोसावी यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध कवी मनोहर परब यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी अशोक माळकर यांनी उपस्थितांचे व कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. गुणवंत विद्यार्थ्यांसह देशसेवकांचा गौरव करत पार पडलेला हा सोहळा कारिवडे ग्रामस्थांच्या देशप्रेम, एकता आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविणारा ठरला.












