चिपळूण (प्रतिनिधी) : भगवान परशुराम पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या आर. सी. काळे प्राथमिक विद्यामंदिर, पेढे-परशुराम येथील विद्यार्थिनी कुमारी वेदिका सचिन होनराव हिने शासनाच्या इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिने रत्नागिरी जिल्हा यादीत ५० वा क्रमांक, तर तालुका यादीत पाचवा क्रमांक मिळविला.
वेदिकाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल भगवान परशुराम पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. अभय सहस्रबुद्धे, संस्थेचे चिटणीस सुनील गमरे, प्राथमिक विभाग स्कूल कमिटीचे चेअरमन सुहास बहुतले, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. नूतन शिंदे तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले. वेदिकाने मिळविलेल्या या यशाबद्दल तिचे कौतुक करत पदाधिकाऱ्यांनी तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तिच्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.













