चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील पेढे परशुराम येथील भगवान परशुराम पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या आर.सी. काळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शनिवार दि. १५ ऑगस्ट रोजी विद्यालयाच्या भव्य प्रांगणात स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक विनायक माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला भगवान परशुराम पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ.अभय सहस्रबुद्धे , सरचिटणीस सुनील गमरे, उपाध्यक्ष विष्णू कोकीरकर, माध्यमिक शालेय समितीचे चेअरमन दिलीप माळी, संस्थेचे संचालक प्रवीण पाकळे, राम पडवेकर, कमलाकर उमासरे, सुरेश पवार, तज्ञ संचालक मोहन शिंदे, संस्थापक सदस्य सदानंद माळी, धोंडीराम कदम, माजी मुख्याध्यापक भास्कर कदम, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिकासव नूतन शिंदे, शिशुवाटिकेच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा मिस्त्री, श्री. संसारे, पर्यवेक्षक विशाखा माळी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी वंदे मातरमचे गायन करण्यात आले. तद्नंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर संगीत कवायत विद्यार्थ्यांनी सादर केली. यामध्ये सुमारे ९०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच माध्यमिक विद्यालयाच्या गुरुकुल विभागातने सुरू केलेल्या लाठीकाठी शिक्षणाचे प्रात्यक्षिक एका तुकडीने सादर केले. त्यामध्ये लाठीकाठी चे विविध हात विद्यार्थ्यांनी लीलया करून दाखवले. उपस्थित लोकांची वाहवा मिळवली.
याप्रसंगी इयत्ता आठवी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थिनी गार्गी राजेंद्र पवार व विद्यार्थी श्रीकृष्ण महाडिक तसेच इयत्ता सातवी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी कुमार आदित्य आनंद खांडेकर यांचा संस्थेचे पदाधिकारी यांच्यामार्फत विशेष सत्कार करण्यात आला. एनएमएमएस परीक्षेत यश मिळवल्याबद्दल गार्गी पवार हिचा विशेष सत्कार झाला. यावेळी मुख्याध्यापक विनायक माळी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सर्व शहिदांचे, हुतात्म्यांचे स्मरण करून देशाच्या निर्मितीसाठी आणि उभारणीसाठी ज्या राष्ट्रपुरुषांनी योगदान दिले, त्यांच्या कार्याचा गौरव केला. विकसित देश घडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले योगदान त्यामध्ये द्यावे, असे आवाहन केले. देश जगातील एक सशक्त लोकशाहीचा देश आकाराला येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष अभय सहस्त्रबुद्धे यांनी भारताने गुलामीच्या श्रृंखला कशा तोडल्या आणि एक नव स्वतंत्र देश कसा आकाराला आला, याची माहिती देऊन देशाला जगात मोठे करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगितले. राष्ट्र निर्माणच्या कामात ज्या युगपुरुषांनी क्रांतिकारकांनी आपल्या मूल्य योगदान दिले, त्यांच्या कार्याचाही यावेळी गौरव केला. तदनंतर रामकृष्ण स्मृती सभागृहामध्ये विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. हे संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश पवार यांनी तर पारितोषिक वितरणाचे सूत्रसंचालन विशाखा माळी यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते.













