दोडामार्ग | प्रतिनिधी
साटेली-भेडशी येथे रविवारी दुचाकी घसरून झालेल्या भीषण अपघातात आवाडे येथील मुदस्सर मशुद सय्यद (वय २२) या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दानिश हुसेन सय्यद (वय २१) हा गंभीर जखमी झाला आहे. जखमी दानिशवर गोवा-बांबोळी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सविस्तर वृत्त असे की,
मुदस्सर आणि दानिश हे दोघे कामानिमित्त दुचाकीने दोडामार्ग येथे गेले होते. काम आटोपून साटेली-भेडशीच्या दिशेने परतत असताना साटेली-भेडशी येथील मैदानाजवळील तीव्र वळणावर भरधाव दुचाकीवरील ताबा सुटला. त्यामुळे दुचाकी रस्त्यावर जोरदार घसरली. अपघात इतका भीषण होता की दोन्ही युवकांच्या डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत होऊन रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता.
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून दोघांनाही ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते मात्र, गंभीर दुखापत झाल्याने मुदस्सर याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
आजोबांच्या विधीसाठी आला अन् काळाचा घाला!
मुदस्सर हा शिक्षणानिमित्त कोल्हापूर येथे राहत होता. त्याच्या आजोबांचे निधन झाल्याने रविवारी त्यांच्या चाळीसाव्याच्या विधीसाठी तो आवाडे या मूळ गावी आला होता. मात्र, काळाने त्याच्यावर झडप घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे.












