माचाळ परिवर्तन सेवा संस्थेचा पुढाकार; जबाबदार पर्यटनाला चालना देण्याचा संकल्प
लांजा प्रतिनिधी :
लांजा तालुक्यातील निसर्गसंपन्न माचाळ गावातील वाढती पर्यटकांची गर्दी लक्षात घेता, स्थानिक पर्यावरण आणि ग्रामसंस्कृतीचे रक्षण करण्यासाठी ‘माचाळ परिवर्तन सेवा संस्था (रजि.)’ यांच्या वतीने गावात भव्य पर्यटन नियमावली फलक उभारण्यात आला आहे.
माचाळ हे केवळ पर्यटनस्थळ नसून निसर्ग, श्रद्धा, परंपरा आणि ग्रामसंस्कारांची ओळख असलेले गाव आहे. पर्यटनाचा विस्तार होत असताना गावची मूळ ओळख, शांतता आणि धार्मिक स्थळांचे पावित्र्य अबाधित राहावे, तसेच पर्यटकांकडून नियमांचे काटेकोर पालन व्हावे, या उद्देशाने संस्थेने हे पाऊल उचलले आहे.
या फलकाच्या माध्यमातून गावात स्वच्छता राखणे, प्लास्टिकमुक्त परिसर ठेवणे, पर्यावरण संवर्धन करणे, धार्मिक स्थळांचा आदर राखणे आणि गावातील शांतता व शिस्त भंग न करणे याविषयी पर्यटकांना स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. पर्यटकांचे स्वागत करतानाच गावची निसर्गसंपदा आणि संस्कृती जपणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे संस्थेने नमूद केले आहे.
सन २०१८ पासून सामाजिक व ग्रामविकासात कार्यरत असलेल्या माचाळ परिवर्तन सेवा संस्थेचा हा उपक्रम पर्यटनाला शिस्तबद्ध व जबाबदार वळण देण्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे.
या उपक्रमाप्रसंगी ॲड. अजय विठ्ठल पाटील, दीपक गंगाराम पाटील, महादेव शंकर भोसले, नितेश शांताराम पाटील, परशुराम पांडुरंग पाटील, अशोक रामचंद्र मांडवकर, विजय जयराम मांडवकर, संजय सावजी गोवळकर, विकास महादेव पाटील उपस्थित होते. तसेच ग्रामस्थ श्रीधर राघो पाटील, बुधजी सखाराम भातडे, दत्ताराम धोंडू पाटील, कृष्णा बाळू मांडवकर, विजय सखाराम पाटील, सोमा अनाजी भातडे, अजय जयराम पाटील आणि इतर सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.














