शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना आधुनिक संगणकीय ज्ञान देणे ही काळाची गरज : जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत

वेंगुर्ले येथे जिल्हा परिषद शाळा नं.१ मध्ये “अद्ययावत संगणक प्रयोगशाळे”चे शानदार उद्घाटन..

वेंगुर्ले : दाजी नाईक 

शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना आधुनिक संगणकीय ज्ञान देणे ही काळाची गरज आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद वेंगुर्ले शाळा नं.१ या शाळेत सुरू झालेली अद्ययावत संगणक प्रयोगशाळा विद्यार्थ्यांसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल. अशा सुविधा निर्माण झाल्यानंतर त्यांची योग्य देखभाल आणि सातत्याने वापर होणे आवश्यक आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या प्रयोगशाळेचा जास्तीत जास्त उपयोग करून द्यावा, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी वेंगुर्ले येथे बोलताना केले आहे.

महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण संचालक (प्राथमिक) पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग मध्ये चार प्रयोगशाळा मंजूर झाल्या. त्यापैकी वेंगुर्ले शाळा नं. १ मध्ये ‘अद्ययावत संगणक प्रयोगशाळा उभारण्यात आली. या प्रयोगशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात मंगळवार १८ ऑगस्ट रोजी संपन्न झाले. विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळावे, या उद्देशाने सुरू झालेल्या या प्रयोगशाळेच्या उद्घाटन प्रसंगी वेंगुर्लेचे नगराध्यक्ष दिलीप गिरप, पंचायत समितीचे सभापती शंकर घारे, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, अटल प्रतिष्ठान चे अध्यक्ष नकुल पार्सेकर, नगरसेविका ॲड. सुषमा प्रभूखानोलकर, नूतन गटशिक्षणाधिकारी अजय ढाणे, भाजप वेंगुर्ले तालुका अध्यक्ष पप्पू परब, भेडशी चे युवा उद्योजक दत्तात्रय उर्फ बाबा टोपले, नगरसेवक प्रणव वायंगणकर, वसंत तांडेल, केंद्रप्रमुख विश्वनाथ जगताप, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अभिषेक वेंगुर्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रमोद कामत म्हणाले की, प्राथमिक शाळांकडे यावर्षी विद्यार्थ्यांचा वाढता कल दिसून येत आहे, ही समाधानाची बाब आहे. शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. पालकांनी केवळ बाह्य आकर्षणाला भुलून आपल्या पाल्यांना दूरच्या शाळांमध्ये पाठविण्यापेक्षा स्थानिक शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा विचार करावा, असेही त्यांनी सांगितले.

*विद्यार्थ्यांना मिळणार आता आधुनिक ज्ञान : शिक्षण सभापती प्रितेश राऊळ*

वेंगुर्ले मधील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळावे, यासाठी डिजिटल शिक्षणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. संगणक प्रयोगशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी दिशा मिळणार असून, अशा उपक्रमांची योग्य देखभाल व निगा राखणे ही शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी मनोगत व्यक्त करताना केले.

या शाळेला सुमारे १८० वर्षांची परंपरा असून रामेश्वर मंदिर परिसरातील या शाळेला विशेष महत्त्व आहे. बॅ. नाथ पै यांनी याच शाळेत शिक्षण घेतले असल्याने शाळेचा गौरव मोठा आहे. अशा ऐतिहासिक शाळेत डिजिटल संगणक प्रयोगशाळा सुरू होणे ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या योग्य आयोजनाबद्दल त्यांनी व्यवस्थापन समिती व शिक्षक, पालक व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले. यावेळी अन्य मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पिळणकर यांनी तर मान्यवरांचे स्वागत व आभार अभिषेक वेंगुर्लेकर यांनी मानले.