रत्नागिरी BREAKING : आजारपणाला कंटाळून ६४ वर्षीय वृद्धाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या;कोतवडे परिसर हादरला!

रत्नागिरी (प्रतिनिधी):
रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे-घारपूरेवाडी येथून एक अत्यंत थरारक आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. तीव्र आजारपणाच्या त्रासाला कंटाळून एका ६४ वर्षीय वृद्धाने स्वतःच्याच परवानाधारक बंदुकीतून मानेवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी घडली आहे.

माधव विष्णू आठवले (वय ६४, रा. घारपूरेवाडी, कोतवडे) असे मृत वृद्धाचे नाव असून या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माधव आठवले हे गेल्या अनेक दिवसांपासून दम्याच्या असह्य आजाराने त्रस्त होते. या सततच्या शारीरिक व्याधीला आणि त्रासाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास, घराच्या मागील बाजूला असलेल्या पडवीत खुर्चीवर बसून त्यांनी आपल्याकडील परवानाधारक बंदुकीतून स्वतःच्या मानेवर थेट गोळी झाडली. गोळीबाराच्या प्रचंड आवाजाने घरामध्ये असलेले त्यांचे पुतणे प्रसाद पांडुरंग आठवले (वय ४२) यांनी तातडीने पडवीकडे धाव घेतली असता, माधव आठवले हे रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेले दिसून आले. या भीषण दृश्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
घटनेची खबर मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह तातडीने शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात रवाना केला. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.