साटेली-भेडशी उपसरपंच सुमन डिंगणेकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव; तहसीलदार राहुल गुरव यांना निवेदन सादर

​दोडामार्ग प्रतिनिधी

​तालुक्यातील अत्यंत महत्त्वाची आणि मोठी मानली जाणाऱ्या साटेली-भेडशी ग्रामपंचायतीमध्ये मंगळवारी मोठा राजकीय भूकंप झाला. उपसरपंच सुमन डिंगणेकर यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून सरपंच यांच्यासह आठ ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्याविरोधात थेट अविश्वास ठराव दाखल केला आहे. याबाबतची रीतसर नोटीस मंगळवारी दोडामार्गचे तहसीलदार राहुल गुरव यांना सुपूर्द करण्यात आली. साटेली-भेडशी ग्रामपंचायतीच्या इतिहासात उपसरपंचांवर अविश्वास ठराव दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने संपूर्ण राजकीय वर्तुळात तीव्र खळबळ उडाली आहे.

​अकरा सदस्य संख्या असलेली साटेली-भेडशी ही तालुक्यातील मोठी आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. सध्या या भागात वेगाने नागरी विस्तार होत असून, या ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये नेहमीच चढाओढ पाहायला मिळते. अशातच उपसरपंचांवर थेट अविश्वास प्रस्ताव आल्याने येथील राजकारण पुन्हा एकदा पेटले आहे.
​
उपसरपंच सुमन डिंगणेकर हे इतर सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने काम करतात, असा आरोप विरोधी गटाने केला आहे. तसेच सरपंच व इतर सदस्यांबद्दल जाणीवपूर्वक गैरसमज पसरवणे आणि गावातील विकासकामांत सतत अडथळे निर्माण करणे, असे गंभीर आरोप नोटीसद्वारे करण्यात आले आहेत.
​या सदस्यांच्या आहेत स्वाक्षऱ्या
दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर सरपंच छाया सखाराम धर्णे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य,​चंद्रकांत जयराम मयेकर,​विष्णू शिवा सुतार
​सेजल संजय धर्णे,​दिपाली किरण मोरजकर,​शोभना किशोर जुवेकर
​संपदा लक्ष्मण गवस,​नीलपर्णा नारायण पार्सेकर,​गणपत ज्ञानेश्वर डांगी,​या नऊ सदस्यांच्या या प्रस्तावावर स्वाक्षऱ्या असल्याने उपसरपंच सुमन डिंगणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली असून, आता तहसीलदार यावर काय कारवाई करतात आणि पुढील विशेष बैठक कधी बोलावतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

 

दोडामार्ग तहसीलदार राहुल गुरव यांच्याकडे अविश्वास प्रस्तावाची नोटीस सुपूर्द करताना सरपंच छाया धर्णे व इतर ग्रामपंचायत सदस्य.