मद्यधुंद ट्रक चालकाची व्हॅगनारला जोरदार धडक
आंबोली :आंबोली नांगरतास येथे ट्रक आणि कार यांच्यात एक भीषण अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने व्हॅगनार कारला जोरदार धडक दिल्याने कारमधील दोन प्रवासी जखमी झाले असून, यातील एकाची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.
आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास मायकल डिसोजा यांच्या आंबोलीतील नांगरतास फार्म हाऊसजवळ हा अपघात घडला. एमएच-१०-एडब्ल्यू-७९४३ या क्रमांकाचा ट्रक रस्त्याच्या विरुद्ध दिशेने चालवला जात होता. याच वेळी समोरून येणाऱ्या एमएच-०४-एचएम-०२१७ या क्रमांकाच्या व्हॅगनार कारला या ट्रकने जोरदार धडक दिली. प्राथमिक माहितीनुसार अपघाताच्या वेळी ट्रक चालक मद्यधुंद अवस्थेत होता.
या भीषण अपघातात माणगाव-कट्टावाडी येथील २७ वर्षीय केशव दत्ताराम केसरकर हे जखमी झाले आहेत, तर ३२ वर्षीय संतोष रामचंद्र धुरी यांना गंभीर दुखापत झाली आहे. घटना घडल्याची माहिती मिळताच आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार मनीष शिंदे आणि लक्ष्मण काळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने कारमध्ये अडकलेल्या दोन्ही जखमींना बाहेर काढले.
अपघातातील जखमींना सुरुवातीला तात्काळ उपचारासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र, दुखापतीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्राथमिक उपचारानंतर त्यांना आंबोली हॉस्पीटलमधून पुढील उपचारासाठी कॉटेज हॉस्पीटल येथे हलविण्यात आले आहे. या संपूर्ण अपघाताचा पुढील सखोल तपास आंबोली पोलीस करत आहेत.













