श्री महालक्ष्मी देवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
**शिरगांव (प्रतिनिधी) :**
देवगड तालुक्यातील रेंबवली येथील श्री महालक्ष्मी देवी मंदिरात शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर रोजी सात प्रहरांच्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांची आखणी करण्यात आली असून, वारकरी भजनांच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय होणार आहे.
शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता देवीची पूजा, दुपारी १२ वाजता हरिनाम सप्ताहाची घटस्थापना, दुपारी १ वाजता महाआरती, तर दुपारी २ वाजल्यापासून देवीची ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. रात्री ८ वाजल्यापासून वारकरी भजने व बाहेरील दिंड्यांच्या भजनांना प्रारंभ होईल. पहाटे ५ वाजता शिवकळा काढण्यात येणार आहे.
शनिवार, दि. २१ नोव्हेंबर रोजी पहाटे काकड आरतीने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार असून, दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सप्ताहानिमित्त मंदिर परिसराची रंगरंगोटी करण्यात येणार असून, आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर सजविण्यात येणार आहे. हरिनामाचा जयघोष आणि भजनांच्या सुरांनी गावात भक्तिमय वातावरण निर्मिती होते.
या सप्ताहात गावातील ग्रामस्थांसह चाकरमानी आणि माहेरवासिनी आवर्जून सहभागी होतात. त्यामुळे या धार्मिक सोहळ्याला दरवर्षी विशेष उत्साहाचे स्वरूप प्राप्त होते.
श्रीहरीच्या हरिनाम सप्ताह सोहळ्याची शोभा वाढविण्यासाठी भाविकांनी तसेच विविध भजन मंडळांनी आपल्या भजन मंडळांसह उपस्थित राहावे, असे आवाहन रेंबवली ग्रामस्थ मंडळ, रेंबवली यांच्या वतीने करण्यात आले आहे.













