सदनिकाधारकांना केलेला कर्जपुरवठा व वसुलीची कारवाई नियमाप्रमाणेच
बँकेचे अध्यक्ष ॲड. शशिकांत सुतार यांचा ईशारा
राजापूर प्रतिनिधी: राजापूर अर्बन बँकेच्या रत्नागिरी शाखेतुन ज्या काही सदनिका धारकांना कर्ज पुरवठा करण्यात आला आहे तो नियमाप्रमाणे व बँकेच्या कर्ज वितरण प्रक्रियेप्रमाणे करण्यात आला आहे. त्यामुळे गेली पाच वर्षे या कर्जाचे हप्ते नियमितपणे भरणारी काही मंडळी आता नाहक बँकेला बदनाम करण्यासाठी उपोषण करत आहेत. मात्र अशा प्रकारे राजापूर अर्बन बँकेला बदनाम करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही असा ईशारा राजापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष ॲड. शशिकांत सुतार यांनी दिला आहे.
कर्जदारांनी संबधित बिल्डरकडून सदनिका ताब्यात घेतली नाही यात बँकेचा काय दोष असा खडा सवाल उपस्थित करत अशा प्रकारे बँकेची नाहक बदनामी करणाऱ्यांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा ईशाराही ॲड. सुतार यांनी दिला आहे. याबाबत बँकेकडून एक प्रसिध्दी पत्रक जारी करण्यात आले आहे.
गतवर्षी पासून राजापूर अर्बन बँकेला काही मंडळी अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. काही कर्जप्रकरणांमध्ये बँकेकडून वा तत्कालीन शाखाधिकारी यांच्याकडून ज्या काही चुका झाल्या त्याबाबत बँकेने कठोर कारवाई करत सदरची कर्जवसुली सुरू केलेली आहे. बँकेच्या सभासदांनी बँकेवर दाखविलेला विश्वास व बँकेच्या प्रगतीसाठी दिलेली साथ याच्या जोरावर बँकेने वर्षभरातच अत्यंत चांगली कामगिरी करत आपली विश्वासार्हता जपली आहे, असेही ॲड. सुतार यांनी नमुद केले आहे.
मात्र असे असतानाही पुन्हा एकदा काही मंडळी बँकेची बदनामी करत आहेत. रत्नागिरीत स्वातंत्र्यदिनी काही कर्जदारांनी बँकेच्या विरोधात उपोषण छेडले. यावेळी त्यांनी काही मुलाखतीही दिल्या व त्या सोशल मिडियावर प्रसिध्द झाल्या आहेत. मुळात या कर्जदारांनी एका बिल्डरकडून सदनिका घेताना त्या बिल्डरशी साठेखत केले. यातील दोघांनी बिल्डरशी तर एका कर्जदाराने जागा मालक व बिल्डर यांच्याशी साठेखत केले. त्यानंतर सन २०२० मध्ये यांनी बँकेशी संपर्क साधून कर्जाची मागणी केली. यानंतर बँकेने कायदेशीर बाबी तपासून बँकेच्या कायदेतज्ञांकडून सर्च रिपोर्ट घेऊन या कर्जदारांना कर्जपुरवठा केला. साठेखतातील नियमांप्रमाणे बिल्डींगच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब पडल्यानंतर कर्जदाराला ८५ टक्के कर्जपुरवठा करावयाचा आहे. त्याप्रमाणे बँकेने हा कर्ज पुरवठा केलेला आहे. त्यानंतर ३१ मार्च २०२५ पर्यंत या कर्जदारांनी आपल्या कर्जखात्यात नियमित या कर्जाचे हप्ते जमा केलेले आहेत. मात्र त्यानंतर त्यांनी कर्जाचे हप्त न भरल्याने त्यांना नोटीसा बजावून वसुलीबाबत कारवाई बँकेने सुरू केलेली आहे. दरम्यान संबधीत बिल्डर फरार असून त्यानेही बँकेकडून कर्ज घेतलेले असल्याने त्याच्या विरोधातही कर्ज वसुलीबाबत बँकेने कायदेशीर कारवाई सुरू केल्याचे ॲड. सुतार यांनी स्पष्ट केले आहे.
मात्र अशा प्रकारे नियमाप्रमाणे कर्ज दिलेले असताना व गेली पाच वर्षे त्याची परतफेडही ही मंडळी करत असताना आत्ताच यांना बँकेने आपल्याला फसवल्याचा साक्षातकार कसा काय झाला? नाहक बँकेला बदनाम करण्याचा हा प्रकार असून असे प्रकार बँक खपवून घेणार नाही. कर्जदार कोणीही असुदे, कितीही मोठा असुदे त्याच्या विरोधात बँक कडक कारवाई करेल. अशा प्रकारे बँकेला बदनाम करण्यामागे कोण आहेत याचीही आंम्हाला चांगलीच माहिती आहे. त्यामुळे अशा प्रकारे बँकेची बदनामी करणाऱ्यांविरोधात आणि त्यांना हे करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्यांविरोधात बँक कठोर कायदेशीर कारवाई करणार करेल असेही ॲड. सुतार यांनी नमुद केले आहे.
राजापूर अर्बन बँकेला शंभर वर्षाची परंपरा आहे, सभासदांचा बँकेवर दृढ असा विश्वास आहे व त्यावरच बँकेने आपली प्रगती साधलेली आहे व करत आहे. सभासदांचा हा विश्वास जपणे हे आमचे कर्तव्य असून त्यासाठी आंम्ही कटीबध्द आहोत असेही ॲड. शशिकांत सुतार यांनी स्पष्ट केले आहे.












