चिपळूण बाजारात मांसाहारी पदार्थांच्या भावात मोठी घसरण

भाज्यांचे दरही नियंत्रणात

चिपळूण (वार्ताहर) : श्रावण महिना सुरू झाल्याने चिपळूण बाजारात मांसाहाराची मागणी काहीशी घटल्यामुळे अंडी, चिकन आणि मासळीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. एकीकडे मांसाहारी खवय्यांची चंगळ उडाली असताना, दुसरीकडे नेहमीच्या तुलनेत यंदा भाज्यांचे दर स्थिर असल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
काही महिने मागे जाता अंड्यांच्या दरात मोठी वाढ झाली होती. शेकड्याचा दर ७६० रुपयांपर्यंत गेला होता. याला वाढती मागणी व कमी होणारा पुरवठा हे कारण होते. मात्र हीच अंडी आता ५५० रुपये शेकडा दराने विकली जात आहेत. याला मागणी कमी व उपलब्धता जास्त हे कारण आहे. तसेच मध्यंतरी चिकनचा दर २६० ते २८० रुपये किलो झाला होता. मात्र आता चिकन १६०, १८०, २०० रुपये किलोने विकले जात आहे. पावसाळ्यात मासेमारीला बंदी असल्याने उपलब्ध होणारे मासेही चढ्या दराने विकले जात होते. आता मासेमारीला परवानगी मिळाल्याने काही प्रमाणात मच्छी बाजारपेठेत येऊ लागली आहे. मात्र सध्या श्रावण महिना सुरू असल्याने मच्छीचे दरही उतरले आहेत.
सध्या मासळी बाजारात बांगडा १८० रुपये किलो, सुरमय ४००, पापलेट १०००, कोळंबी २५० ते ३००, बेडा, बोंबील १६०, मांदेली १००, मुशी, राजाराणी २००, खेकडे १०० ते ४०० रुपये किलोने विकले जात आहेत. दर कमी असल्याने व गेले काही महिने मासे खाता न आल्याने सध्या मच्छीची मागणी मोठ्याप्रमाणात वाढली आहे. एकीकडे अंडी, चिकन, मच्छीचे दर कमी झाले असले तरी दुसरीकडे मात्र मटणाचा दर कमी झालेला नाही. आजही मटण ९६० रुपये किलोने विकले जात आहे. मात्र श्रावण सुरू असल्याचा परिणाम मटणाच्या मागणीवरही झाला आहे. श्रावण महिना असला तरी याच्याशी संबधित नसलेले अनेकजण मासांहार करतात. त्यामुळे अशा ग्राहकांकडून मोठ्याप्रमाणात विशेषतः चिकनची खरेदी होते. त्यामुळे कमी दराचा त्यांना मोठा फायदा होत आहे.
चौकट-
श्रावण महिन्यात भाज्यांचे दर
श्रावण महिन्यामध्ये मांसाहार स्वस्त झाला की भाज्यांचे दर वाढतात असा अनुभव दिसून येत आहे. मात्र यावर्षी चित्र उलटे आहे. भाज्यांचे दर स्थिर आहेत. सध्या बाजारात टोमॅटो २५ रुपये किलो, मिरची गवार फरसबी ८० रुपये, कोबी ४० रुपये, कारली फ्लॉवर ६० रुपये, काकडी गाजर ५० रुपये दराने विकली जात असल्याचे पानगल्लीतील भाजी व्यवसायिक दस्तगीर मरतगी यांनी सांगितले.