चिपळूण ते जयपूर; मास्टर्स क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंच्या नव्या क्रिकेट प्रवासाला सुरुवात

उच्चस्तरीय क्रिकेटचा अनुभव घेण्याची संधी
 रत्नागिरी जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना मोठ्या व्यासपीठावर नेण्याचा अकॅडमीचा प्रयत्न

चिपळूण (प्रतिनिधी) : दिल्ली येथील यशस्वी क्रिकेट टूरनंतर चिपळूण येथील मास्टर्स क्रिकेट अकॅडमीने आपल्या खेळाडूंसाठी आता जयपूर, राजस्थान येथे क्रिकेट टूरचे आयोजन केले आहे. चिपळूण तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील क्रिकेटपटूंना मोठ्या शहरांमध्ये आणि नामांकित मैदानांवर खेळण्याचा अनुभव मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
मास्टर्स क्रिकेट अकॅडमीने रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रिकेट क्षेत्रात कार्य सुरू केल्यापासून सिझनबॉल क्रिकेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. जलद क्रिकेटचा आधुनिक चेहरा खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींसमोर आणतानाच विविध स्पर्धा, प्रशिक्षण उपक्रम आणि क्रिकेट टूरच्या माध्यमातून खेळाडूंना प्रत्यक्ष मैदानावरील अनुभव देण्यावर अकॅडमीचा भर आहे. केवळ क्रिकेटचे प्रशिक्षण देणे एवढ्यापुरते अकॅडमीचे कार्य मर्यादित न ठेवता, खेळाडूंना देशातील विविध शहरांमध्ये जाऊन वेगवेगळ्या वातावरणात आणि परिस्थितीत खेळण्याची संधी मिळावी, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. गावपातळीवरून पुढे येणाऱ्या खेळाडूंनाही मोठ्या मैदानावर खेळण्याची आणि आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखविण्याची संधी मिळावी, हे अकॅडेमीचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
विशेष म्हणजे, मास्टर्स क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून केवळ आपल्या अकॅडमीतील खेळाडूंनाच संधी दिली जात नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील इतर क्रिकेट अकॅडमी आणि क्लबमधील गुणवंत खेळाडूंनाही विविध स्पर्धांमध्ये मास्टर्स क्रिकेट अकॅडमीच्या संघातून खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे जिल्ह्यातील क्रिकेटपटूंमध्ये परस्पर सहकार्य आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होत आहे. “क्रिकेट केवळ स्वतःच्या अकॅडमीपुरते मर्यादित न राहता जिल्ह्यातील खेळाडूंच्या प्रगतीसाठी वाढले पाहिजे. खेळाडू पुढे गेले पाहिजेत आणि रत्नागिरी जिल्ह्याचे नाव मोठ्या क्रिकेट व्यासपीठावर पोहोचले पाहिजे,” अशी भूमिका अकॅडमीचे प्रशिक्षक आकाश पवार यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यातील सिझनबॉल क्रिकेटला अधिक चालना मिळावी आणि स्थानिक खेळाडूंना जास्तीत जास्त संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी भविष्यातही विविध उपक्रम आणि क्रिकेट टूर आयोजित करण्याचा मानस अकॅडेमीने व्यक्त केला आहे. खेळाडूंची स्वप्ने मोठी असतील, तर त्यांना मोठ्या मैदानापर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी आमची, असा विश्वास प्रशिक्षक आकाश पवार यांनी व्यक्त केला. दिल्लीनंतर आता जयपूरचा प्रवास हा मास्टर्स क्रिकेट अकॅडेमीच्या खेळाडूंसाठी केवळ एक क्रिकेट टूर न राहता, नव्या अनुभवांची आणि मोठी स्वप्ने पाहण्याची संधी ठरणार आहे. ‘चिपळूण ते जयपूर-स्वप्नांच्या दिशेने आणखी एक पाऊल’ या भावनेने खेळाडू या नव्या क्रिकेट प्रवासासाठी सज्ज झाले असल्याची माहिती मास्टर्स क्रिकेट अकॅडमीचे प्रशिक्षक आकाश पवार यांनी दिली.