▪️मसुरे प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांसाठी सर्वंकष आरोग्य सेवा प्रशिक्षण वर्ग

मसुरे | झुंजार पेडणेकर
ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावाजवळच अधिक सक्षम, दर्जेदार व सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी तसेच “अधिक उपचार, कमी रेफरल” ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र, मसुरे येथे दोन दिवसीय सर्वंकष प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले.
राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर तसेच आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक यांच्या संकल्पनेतून हा प्रशिक्षण कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र, मसुरे येथे आयोजित या प्रशिक्षणाचे उद्घाटन जन आरोग्य समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषद सदस्या क्षमा हडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर प्राचार्य डॉ. योगेश साळे यांनी भेट देऊन प्रशिक्षणाचा आढावा घेतला. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. साळे यांनी सांगितले की, “सर्वंकष आरोग्य सेवा प्रशिक्षणामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांचे ज्ञान व कौशल्य अधिक सक्षम होणार असून, नागरिकांना त्यांच्या गावाजवळच गुणवत्तापूर्ण व सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध होण्यास मदत होईल. तसेच अनावश्यक रेफरलचे प्रमाण कमी करून प्राथमिक स्तरावर अधिकाधिक उपचार देणे शक्य होणार आहे. डॉ. योगेश साळे यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र, मसुरेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनासोबतच आरोग्यदायी व स्वच्छ परिसर निर्माण करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
या प्रशिक्षणासाठी तुळस येथील आरोग्य सेवक श्री. द्वारकानाथ बावडेकर, समुदाय आरोग्य अधिकारी श्रीमती सायली मानेचकर, माणगाव येथील आरोग्य सेविका श्रीमती सायली कन्याळकर, हिवाळे येथील आरोग्य सेविका श्रीमती संजीवनी कणेकर, मसुरे येथील आरोग्य सेविका श्रीमती आरती कामत तसेच सावंतवाडी तालुका समूह संघटक श्रीमती बिनिता दळवी हे प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते.
या दोन दिवसीय प्रशिक्षणामध्ये वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी (CHO), आरोग्य सहाय्यक, एएनएम, एमपीडब्ल्यू तसेच आशा स्वयंसेविका सहभागी झाल्या होत्या. प्रशिक्षणादरम्यान तांत्रिक सत्रे, गटचर्चा व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विविध आरोग्य विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणामध्ये गर्भवती व प्रसूतीपश्चात मातांची काळजी, नवजात शिशू व बाल आरोग्य, किशोरवयीन आरोग्य, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे निदान, प्रतिबंध व व्यवस्थापन, मानसिक आरोग्य, वृद्धांची आरोग्य सेवा, आपत्कालीन वैद्यकीय सेवा तसेच आयुष उपचार पद्धतींचा प्रभावी वापर आदी महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या शेवटी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवर, प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी यांचे आभार मानले.













