राजापूर प्रतिनिधी : राजापूर तालुक्यातील खिणगिणी परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून, दोन दिवसांपूर्वी बिबट्याने चार वर्षांच्या गायीवर हल्ला करून तिची शिकार केल्याची घटना घडली. या घटनेमुळे खिणगिणी-कुणबीवाडी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खिणगिणी-कुणबीवाडी येथील शेतकरी कृष्णा हरी डोंगरकर यांची गुरे रानात चरण्यासाठी गेली होती. गावातील जुने नवलादेवी मंदिर व भातशीचे कुट परिसरात बिबट्याने त्यांच्या चार वर्षांच्या गायीवर हल्ला केला. या हल्ल्यात गाय ठार झाली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर मृत गायीचा पंचनामा करण्यात आला. या पंचनाम्यानुसार शेतकरी कृष्णा डोंगरकर यांचे सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पंचनामा करताना रवींद्र डोंगरकर, दत्ताराम डोंगरकर, माजी सरपंच विजय पाध्ये, पोलीसपाटील अशोक डोंगरकर, रमेश डोंगरकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राठोड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गुरे चरण्यासाठी रानात सोडताना शेतकऱ्यांना विशेष खबरदारी घ्यावी लागत आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने परिसरात तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.













