देवरूख (प्रतिनिधी)
देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्रीमती. अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स, देवरूख या प्रशालेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त नवीन बोधचिन्हाच्या अनावरणाचा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात संस्थाध्यक्ष व प्रशालेचे संस्थापक सदानंद भागवत, सचिव शिरीष फाटक, शाळा समितीच्या अध्यक्षा ॲड. वेदा प्रभुदेसाई, समिती सदस्य सुधीर गावडे, शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन शेडगे, मुख्याध्यापिका सोनाली नारकर व दीक्षा खंडागळे यांच्या प्रमुख उपस्थिती प्रशालेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त साकारण्यात आलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन योगिनी केतकर यांनी केले. नवीन बोधचिन्हाची संकल्पना व त्यामागील विचार पूर्वा चव्हाण यांनी उपस्थितांसमोर विशद केली. या बोधचिन्हामध्ये शाळेची २५ वर्षांची गौरवशाली वाटचाल, ज्ञान, संस्कार, शैक्षणिक प्रगती, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि उज्ज्वल भविष्याची दिशा यांचा सुंदर मिलाफ दर्शविण्यात आला आहे. हे बोधचिन्ह शाळेच्या मूल्यांची, परंपरेची आणि भविष्यातील ध्येयाची ओळख करून देणारे प्रतीक ठरणार आहे. तसेच संस्थेचे ब्रीदवाक्य ‘ज्ञान हाच पराक्रम’ याला यामध्ये विशेष महत्त्व देण्यात आले आहे. शाळेचे बोधचिन्ह तयार करण्याचे कार्य कलाशिक्षक सूरज मोहिते, नितीन शेडगे आणि मंगेश जाधव यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी ही शाळा म्हणजेच माझे सामाजिक कार्यातील पहिले अपत्य असल्याचे सांगितले. त्यांनी आपल्या भाषणातून शाळेच्या २५ वर्षांच्या शैक्षणिक प्रवासाचा गौरवपूर्ण आढावा घेतला. शिक्षक, विद्यार्थी, पालक, संस्थेचे पदाधिकारी आणि कर्मचारी यांच्या योगदानामुळे शाळेने प्रगतीची वाटचाल केली असल्याचे त्यांनी नमूद केले. रौप्यमहोत्सवी वर्ष हे केवळ गतकाळाचा गौरव करण्याचे नव्हे, तर भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी नवी दिशा ठरविण्याचे वर्ष असल्याचे याप्रसंगी नमूद केले. शिरीष फाटक यांनी संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबत कौशल्ये, संस्कार आणि आत्मविश्वास विकसित करावा, असे आवाहन केले. वेदा प्रभुदेसाई यांनी शाळेच्या रौप्यमहोत्सवी वाटचालीबद्दल आनंद व्यक्त करत भविष्यातही शाळेने गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्याचे कार्य अविरत सुरू ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मिलिंद शिंदे, सुयोग बांडागळे, तसेच शाळेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.












