कुडाळ : समाजहितासाठी सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांसह सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांचा युवासेना प्रदेश कार्यालयाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याचा गौरव करण्यात आला.
युवासेनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक, युवक तसेच समाजातील विविध घटकांच्या प्रश्नांसाठी स्वरूप वाळके सातत्याने सक्रिय आहेत. नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याबरोबरच गरजू घटकांना मदत, युवकांना प्रोत्साहन आणि जनहिताच्या विविध विषयांवर त्यांनी पुढाकार घेतला आहे.
या सामाजिक कार्याची दखल घेत युवासेना प्रदेश कार्यालयाच्या वतीने त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी युवासेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संग्राम चाळसकर, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातील चारही तालुकाप्रमुख आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
या सन्मानामुळे सामाजिक कार्यासाठी नवी ऊर्जा मिळाली असून, भविष्यातही सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अधिक व्यापक स्वरूपात काम करण्याचा निर्धार स्वरूप वाळके यांनी व्यक्त केला.
प्रदेश पातळीवर झालेल्या या गौरवामुळे त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेतली गेल्याने युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.













