भारताची अर्थव्यवस्था मजबूत, युध्दजन्य स्थितीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर कोणताही विपरीप परिणाम नाही- सतिश मराठे

राजापूर तालुका कुणबी सह. पतपेढीच्या वतीने सतिश मराठे यांचा सत्कार करताना पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर याप्रसंगी प्रकाश लोळगे, धनंजय यादव, दादा विचारे, समीर जानवलकर, जितेंद्र पाटकर आदी.तर दुसऱ्या छायाचित्रात उपस्थितांशी संवाद साधताना सतिश मराठे.
मराठे यांची राजापूर तालुका कुणबी सह. पतपेढीला सदिच्छा भेट; पतपेढीच्या कामकाजाचे केले कौतुक

राजापूर (वार्ताहर): सन २०१९ मध्ये आलेले कोरोनाचे संटक आणि त्यानंतर पुढील काही काळात जागतिक पातळीवर निर्माण झालेली युध्दजन्य परिस्थिती यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेत काहीशी अस्थितरता निर्माण झाली होती. मात्र भारतीय अर्थव्यवस्था या परिस्थितीतही टिकून राहिली आहे. आजही अमेरिका आणि इराण युध्दाचे ढग जगावर असतानाही भारतीय अर्थव्यवस्थेचा ग्रोथ चांगला राहिलेला आहे. भारताच्या मजबुत आर्थिक धोरणामुळे हे शक्य झालेले असून यावर्षीही हा ग्रोथ सहा ते सात टक्के इतका राहिल असा विश्वास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक व देशातील सहकार क्षेत्रातील तज्ञ सतिश मराठे यांनी येथे केले.

छोटया सहकारी बँका व सहकारी संस्था या भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्वाचा घटक असून आरबीआयच्या नियमांप्रमाणे या संस्थानी काम केले, सर्वसामान्य जनतेला आर्थिक सेवा देताना आपली ध्येय धोरण ठरवून योग्य असे रिस्क मॅनेजमेंट केले तर निश्चितच अशा संस्था देशाच्या अर्थकारणात क्रांती करतील असेही मराठे यांनी नमुद केले. राजापूर तालुका कुणबी सह. पतपेढीने ग्रामीण भागात केलेले काम आणि प्रगती निश्चितच सहकारी संस्थांना प्रेरणा देणारी अशी असल्याचे गौरवोद्गारही मराठे यांनी यावेळी काढले.

राजापूर तालुका कुणबी सह. पतपेढीला नुकतीच कोकण विभाग कार्यक्षेत्राची मंजूरी प्राप्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मराठे यांनी राजापूर तालुका कुणबी पतपेढीला सदिच्छा भेट दिली. यावेळी पतपेढीच्या प्रधान कार्यालयात झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राजापूर तालुका कुणबी सह. पतपेढीच्या वतीने पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांनी त्यांचे यथोचित स्वागत व सत्कार केला.

यावेळी श्री. मराठे यांचे समवेत सहकार भारतीचे कोकण विभाग प्रमुख धनंजय यादव, तसेच लांजाचे दादा विचारे, मत्स्य प्रकोष्ट शैलेश दरगुडे, सहकार भारतीचे विनोद म्हात्रे, समीर जानवलकर तसेच यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश लोळगे, सी.ए. निलेश पाटणकर, सीईओ जितेंद्र पाटकर यांसह संचालक मंडळ आणि कर्मचारी वृंद उपस्थित होता.

अर्थव्यवस्थेत आलेले डिजिटलायटेशन हा देखील प्रगत अर्थव्यवस्थेतील महत्वाचा भाग असून अर्थव्यस्थेतील क्यू आर कोडने व्यापारी, ग्राहक आणि बँका यांना पत मिळवून दिली असल्याचे मराठे यांनी सांगितले. तर गेल्या काही वर्षात देशात झालेल्या आर्थिक प्रगतीवर बोलताना त्यांनी केंद्र शासनाने घेतलेल्या काही चांगल्या निर्णयांमुळे २५ कोटी जनता दारिद्रय रेषेच्या वर आली, देशात नवीत पाच कोटी उद्योजक निर्माण झाले, मुद्रा लोनने देशातील व्यवसायिकांना व व्यवसायाला गती दिली, यातुन छोटया कर्जदारांची संख्या वाढली आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळाल्याचे त्यांनी नमुद केले. जनधन खात्याच्या माध्यमातून शासनाच्या योजनांचा लाभ थेट लाभार्थ्याला प्राप्त झाला त्याचा आर्थिक उलाढालीवर चांगला परिणाम दिसून आला.

छोटया पतसंस्था या अर्थव्यवस्थेतील महत्वाचा भाग आहे. खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात सामान्यातील सामान्य माणसापर्यंत पोहचून त्याला या प्रवाहात आणण्याचे काम या संस्था करतात. त्यामुळे या संस्थांनी भविष्यात आपला व्यवसाय वाढविताना तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, भांडवल वाढविले पाहिजे, आपले रिस्क मॅनेजमेंट आपणच तयार केले पाहिजे, प्रसंगी होणारा तोटाही पचवून पुन्हा उभे रहाण्याची तयारी केली पाहिजे असेही मराठे यांनी यावेळी सांगितले. यावेळी मराठे यांनी पतसंस्थांनी पुढील पाच वर्षाचे नियोजन करताना कोणत्या गोष्टींचे पालन केले पाहिजे या विषयीचा मौलिक असे मार्गदर्शन केले. पतसंस्थांनी सभासद ठेवीदारांची विश्वासार्ह्यतेला तडा जाईल असे पाऊल उचलता कामा नये, विश्वासार्ह्यता हीच पतसंस्थांची फार मोठी गुंतवणूक असल्याचे त्यांनी नमुद केले.

प्रारंभी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर यांनी पतसंस्थेची मागील दहा वर्षातील वाटचाल ते कोकण कार्यक्षेत्राची मान्यता या विषयीची माहिती दिली. येणाऱ्या काळात नवीन शाखा उभारणीबरोबरच पतसंस्थेची गुणात्मक वाढ कशी होईल याकडे लक्ष पुरविले जाणार असल्याचे सांगितले. तर रिझर्व्ह बँकेच्या काही नियमांचा सहकारी संस्थांना जाचक ठरणाऱ्या नियम अटींबाबत त्यांनी सविस्तर विवेचन केले. सहकार भारतीच्या माध्यमातून हे प्रश्न मार्गी लागावेत अशी अपेक्षा मांडवकर यांनी व्यक्त केली तर याबाबतचे सविस्तर निवेदन श्री. मराठे यांना सादर केले. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचर सिईओ जितेंद्र पाटकर यांनी करून दिला.