वाढदिवस विशेष : समाजकारणालाच आपले जीवन मानणारे रत्नागिरीचे तडफदार नेतृत्व – शैलेश बेर्डे

आजच्या धकाधकीच्या आणि स्वार्थीपणाच्या काळात माणसाला स्वतःसाठी वेळ काढणे कठीण झाले आहे, तिथे इतरांच्या समस्या सोडवण्यासाठी अहोरात्र झिजणारी मोजकीच माणसे समाजात पाहायला मिळतात. कोणतेही काम असो, कोणाचेही असो आणि दिवसाच्या चोवीस तासांत कधीही असो, चेहऱ्यावर कायम गोड स्मिताहास आणि ओठावर मदतीची तयारी असणारे रत्नागिरीतील एक निस्वार्थी नाव म्हणजे शैलेश बेर्डे. ३ नोव्हेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाचा घेतलेला हा आढावा.

कष्टमय प्रवास आणि अफाट जनसंपर्क
कोणतीही मोठी राजकीय किंवा कौटुंबिक पार्श्वभूमी पाठीशी नसताना, केवळ प्रामाणिकपणा आणि समाजसेवेचे व्रत हाती घेऊन शैलेश बेर्डे यांनी आपले स्थान निर्माण केले आहे. गेली तब्बल ३२ वर्षे ‘राधाकृष्ण नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये’ दैनिक बचत संकलक म्हणून नोकरी करत त्यांनी हा प्रवास केला आहे. गाडीतळ ते साळवी स्टॉप हा सारा प्रवास ऊन-पावसाची तमा न बाळगता अनेक वर्षे त्यांनी चालत पूर्ण केला. नोकरी आणि समाजकारण यांचा असा ताळमेळ क्वचितच पाहायला मिळतो. त्यांच्या याच प्रामाणिक, नम्र व प्रेमळ स्वभावामुळे राधाकृष्ण पतसंस्थेलाही मोठा जनसंपर्क आणि विश्वासार्हता लाभली. कामाच्या व्यापातही कुणी हाक मारलीच, तर रात्री-अपरात्री धावून जाणारे त्यांचे पाय कधीच थकले नाहीत.
गोरगरिबांच्या पाठीशी खंबीर आधारस्तंभ
शैलेश बेर्डे यांच्या समाजकारणाचा पसारा खूप मोठा आहे. मग तो निर्मल बालरुग्णालयाजवळ मृत कुत्र्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न असो, किंवा स्टेट बँक कॉलनी येथे माडाचे झाड विजेच्या तारांवर पडून खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रश्न असो; प्रशासकीय यंत्रणेशी समन्वय साधून प्रत्येक अडचणीवर त्यांनी तातडीने मात केली आहे.
शैक्षणिक क्षेत्रात तर त्यांचे योगदान अनेकांच्या आयुष्यात प्रकाश देणारे ठरले आहे. ज्यांच्या घरात शिक्षणाचा दिवा लावण्यासाठी आर्थिक अडचणी असतात, अशा होतकरू व गरजू मुलांना ते मदत करत. यांचे त्यांना रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह सतीश शेवडे व मनोज पाटणकर यांचे चांगले सहकार्य मिळते असं ते आवर्जून सांगतात.

संकटकाळात धावून जाणारा सच्चा कार्यकर्ता
महाभयंकर कोरोना महामारीच्या काळात जिवाची पर्वा न करता त्यांनी कोरोना रुग्णांची सेवा केली. शासकीय दवाखान्यात शेकडो लोकांच्या गर्दीमध्ये स्वतः हजर राहून सर्वसामान्यांना कोवॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड लस मिळवून देण्यासाठी त्यांनी मोलाची सेवा बजावली. याशिवाय हिंदू जनजागृतीच्या सभांना उपस्थिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार आणि राष्ट्रप्रेमाचे उपक्रम यात त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असतो.

साळवी स्टॉप परिसरातील नागरिकांना दिलासा
रत्नागिरी शहरातील, साळवी स्टॉप येथील शासकीय कर्मचारी वसाहतीसमोर गेल्या पाच-सहा महिन्यांपासून साचलेल्या दुर्गंधीयुक्त सांडपाणी आणि अस्वच्छतेच्या समस्येने उग्र रूप धारण केले होते. या गंभीर समस्येची दखल घेऊन शैलेश बेर्डे व सहचारिणी रत्नागिरी जिल्हा ओबीसी महिला मोर्चा उपाध्यक्षा सौ. सायली बेर्डे यांनी प्रशासकीय यंत्रणेशी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला आणि हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला. त्यांच्या या जलद व प्रभावी कारवाईबद्दल परिसरातील नागरिकांनी त्यांचे तोंडभरून कौतुक केले.

राजकीय व सामाजिक वाटचाल
त्यांच्या या निस्वार्थी समाजकार्याची दखल पक्षाने घेऊन त्यांच्याकडे ‘भारतीय जनता पार्टी, रत्नागिरी शहर उपाध्यक्ष’ या पदाची धुरा सोपवली. या संपूर्ण प्रवासात त्यांना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणसाहेब, माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे साहेब, मंत्री नितेश राणे साहेब , विधान परिषद आमदार प्रमोद जठार, प्रदेशाध्यक्षांचे स्वीय सहायक श्री अनिकेत पटवर्धन, जिल्हाध्यक्ष श्री प्रशांत यादव, महिला जिल्हाध्यक्ष सौ वर्षा ढेकणे, शहराध्यक्ष श्री दादा ढेकणे यांचे सहकार्य मिळते. तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि ज्येष्ठ मार्गदर्शकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
या सर्व प्रवासात त्यांच्या पाठीशी त्यांची सहचारिणी सौ. सायली बेर्डे यांची खंबीर साथ राहिली आहे. आपल्या पतीच्या सामाजिक कार्यात त्या सावलीसारख्या सोबत असतात. तसेच, वडिलांच्या कष्टाची जाण ठेवून चिरंजीव अथर्व याने नुकतेच एमबीए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.
कोणत्याही मोठ्या पदाची लालसा न बाळगता केवळ आणि केवळ जनसेवेलाच आपलं सर्वस्व मानणाऱ्या शैलेश बेर्डे यांच्याकडून प्रेरणा घेऊन रत्नागिरीच्या विकासाचा हा प्रवास असाच सुरू राहो आणि त्यांचे नगरसेवक होण्याचे स्वप्न आगामी काळात नक्की पूर्ण होवो, हीच श्री भैरी चरणी प्रार्थना!
शैलेशजी आपणास वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!