सिंधुदुर्गचे राज्यस्तरावर प्रतिनिधित्व; सर्व चिमुकले बुलबुल पुरस्कारास पात्र सावतवाडी : जि. प. प्राथमिक शाळा कुणकेरी नं. ३ च्या ‘ताराराणी बुलबुल पथका’ने राज्यस्तरीय बुलबुल पुरस्कार चाचणी परीक्षेत दमदार कामगिरी करत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल केले आहे. मार्च २०२६ मध्ये सोनतळी, कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय बुलबुल राज्य पुरस्कार चाचणी परीक्षेत या पथकातील सर्व विद्यार्थी पुरस्कारासाठी पात्र ठरले.
विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या राज्यस्तरीय परीक्षेसाठी सहभागी झालेले हे एकमेव बुलबुल पथक होते. इयत्ता तिसरी व चौथीतील चिमुकल्या बुलबुलनी आपल्या कौशल्याचे आणि शिस्तीचे उत्कृष्ट प्रदर्शन करत हे उल्लेखनीय यश संपादन केले.
शाळेच्या फ्लॉक लीडर श्रीमती निता नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदी विश्राम सावंत, निष्ठा उत्तम सावंत, लावण्या अनिल धुरी, रिशिता राजाराम धुरी, ध्रुवी नागेश सावंत, सई तानाजी सावंत, त्रिशा तेजस गावडे, प्रिया शंकर राणे आणि समृद्धी सचिन चव्हाण या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय यश मिळविले.
या यशासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. मिंगेल मान्येकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कब मास्टर श्री. नितीन नामदेव सावंत यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले.
शाळेच्या या उल्लेखनीय राज्यस्तरीय यशाबद्दल कोलगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. संदीप निऊंगरे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीमती विनया सावंत, आंबेगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रदीप म्हाडगुत, कुणकेरी गावच्या सरपंच श्रीमती सोनिया सावंत तसेच पालक आणि ग्रामस्थांनी सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले आहे.












