कालभैरव धंदरे येथील एकावर गुन्हा दाखल
लांजा (प्रतिनिधी ) : बोलेरो पिक अप गाडीतून बैलांना वेदना होतील अशा पद्धतीने दाटीवाटीने बांधून त्यांची वाहतूक करणाऱ्या कालभैरव नगर धंदरे येथील
एकावर लांजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
ही घटना शनिवार दिनांक २२ ऑगस्ट रोजी रात्री ११.११ वाजता मौजे गोविळ स्टॉप या ठिकाणी घडली होते. या घटनेतील २ लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप गाडी आणि २१ हजार रुपये किमतीचे दोन बैल असा एकूण २ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश गणपती लांबोरे (वय २७, राहणार वाडगाव रोड कालभैरव नगर धुंदरे )हा आपल्या ताब्यातील बोलेरो पिकअप (क्रमांक एम एच ०८ एपी १२११) मधून दोन बैल त्यांना वेदना होतील अशा पद्धतीने दोरीने बांधून त्यांना हालचाल करता येणार नाही अशा दाटीवाटी पद्धतीने गाडीच्या हौद्यामध्ये भरून त्यांना वायू विसर्जन होणार नाही अशा चारही बाजूने बंदिस्त करून , त्यांची चाऱ्या पाण्याची सोय न करता, त्यांची वैद्यकीय तपासणी न करता, प्रमाणपत्र न घेता त्यांना दुखापत होईल अशा पद्धतीने त्यांची वाहतूक करताना शनिवारी रात्री ११.११ वाजता गोविळ रस्त्याने वाहतूक करत असताना आढळून आला होता.
याप्रकरणी गणेश लांबोर याच्यावर प्राण्यांचे छळ प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११(१),( डी)(ई),( एफ), सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११९ सह प्राण्यांची वाहतूक नियम १९७८ चे कलम ४७,४८,४९,५४, ५६ तसेच मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम ६६/१९२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेत बैलांच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली २ लाख रुपये किमतीची बोलेरो पिकअप तसेच बैल पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल उर्मिला शेडे या करत आहेत













