नेत्रावती एक्सप्रेसच्या संगमेश्वर थांब्याला तीन वर्षे पूर्ण; गाडीचे संगमेश्वर रोड स्थानकात उत्साहात स्वागत

संगमेश्वर : 

संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर नेत्रावती एक्सप्रेसला थांबा मिळून २२ ऑगस्ट २०२६ रोजी तीन वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने ‘निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे’ फेसबुक ग्रुपच्या वतीने संगमेश्वर रोड स्थानकात छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

२२ ऑगस्ट २०२३ पासून नेत्रावती एक्सप्रेसला संगमेश्वर रोड येथे थांबा मिळाला असून, हा थांबा संगमेश्वर तालुक्यातील विद्यार्थी, नोकरदार, पर्यटक, व्यावसायिक, चाकरमानी आणि सर्वसामान्य प्रवाशां साठी महत्त्वाची सुविधा ठरला आहे.

तिसऱ्या वर्षपूर्तीनिमित्त नेत्रावती एक्सप्रेसचे संगमेश्वर रोड स्थानकात उत्साहात स्वागत करण्यात आले. गाडीला हार घालून पूजा करण्यात आली, तसेच गाडीच्या लोको पायलटचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन, गणपत दाभोलकर, नितेश मालप, इशांत जिमन, आरुष मालप आणि पुष्कर गीते उपस्थित होते.

नेत्रावती एक्सप्रेसचा थांबा मिळाल्याने समाधान व्यक्त करतानाच संगमेश्वर रोड स्थानकावर आणखी महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरूच ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

एक थांबा मिळाला, संघर्ष थांबला नाही; संगमेश्वरच्या रेल्वे विकासासाठी लढा सुरूच राहणार,” असा निर्धार ग्रुपचे प्रमुख व पत्रकार संदेश जिमन यांनी व्यक्त केला.