सेवा अभियान म्हणजे शासन आणि जनतेतील विश्वासाचा सेतू : आ. प्रमोद जठार

सावंतवाडीत आयोजित ‘सेवा अभियाना’चा दिमाखदार शुभारंभ

नागरिकांच्या विविध वैयक्तिक आणि सार्वजनिक समस्यांचा केला जाणार निपटारा

सावंतवाडी । प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाचे ‘सेवा अभियान’ हे केवळ एक औपचारिक उपक्रम नसून, ते शासन, प्रशासन आणि तळागाळातील जनता यांच्यातील थेट समन्वयाचा एक अत्यंत प्रभावी दुवा ठरेल,” असा विश्वास माजी आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला. सावंतवाडीत आयोजित ‘सेवा अभियाना’च्या दिमाखदार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अभियानामुळे नागरिकांचे वैयक्तिक व सार्वजनिक प्रश्न थेट मंत्रालय पातळीवरून वेगाने मार्गी लागतील, असे सांगत त्यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.

नागरिकांच्या तळागाळातील समस्या आणि अडचणी थेट मंत्रालय पातळीवरून दूर करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून राज्यभरात सेवा अभियान राबवले जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या विशेष अभियानाचा शुभारंभ सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून उत्साहात करण्यात आला. या अभियानाच्या माध्यमातून दर महिन्याला नागरिकांच्या विविध वैयक्तिक आणि सार्वजनिक समस्यांचा निपटारा केला जाणार आहे.

या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विशेष प्रतिनिधींची नियुक्ती केली आहे. हे प्रतिनिधी जिल्हा व तालुकास्तरावर प्रत्यक्ष जाऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे काम करत आहेत. सहाय्यसचिव संतोष साखरे यांच्याकडे या संपूर्ण कामकाजाची मुख्य जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

सावंतवाडी येथे आयोजित या शुभारंभ प्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर , जिल्हा बँक संचालक महेश सारंग, नगरपरिषद सभापती सुधीर आडीवरेकर, मोहिनी मडगावकर, तालुका मंडळ अध्यक्ष संतोष राऊळ, मधुकर देसाई यांच्यासह पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम प्रसंगी उपस्थित नागरिकांकडून त्यांच्या विविध समस्या व अडचणींविषयीची निवेदने थेट स्वीकारण्यात आली. प्राप्त झालेल्या सर्व निवेदनांवर तातडीने प्रशासकीय आणि शासकीय पातळीवर कार्यवाही करून नागरिकांना लवकरात लवकर दिलासा देण्याचा दृढ संकल्प यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.