कोलगाव-सावंतवाडी सीमेवरील कचरा समस्येने ग्रामस्थ त्रस्त : नगराध्यक्षांना निवेदन 

दोन दिवसांत कचरा साफ करण्याचे नगराध्यक्षांचे आश्वासन

सावंतवाडी : सावंतवाडी-कोलगाव हद्दीतील आयटीआयजवळील पाणवठ्याच्या ठिकाणी म्हणेच ओहोळालगत मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत कोलगाव ग्रामस्थ समीर बाबाजी धुरी यांनी नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोंसले यांच्याकडे निवेदन सादर करत तातडीने ती जागा कचरा मुक्त करण्याची मागणी केली. यावेळी नगरसेविका सुनिता पेडणेकर उपस्थित होत्या.

 

सावंतवाडीतील रहिवासी तसेच हॉटेल व्यावसायिकांकडून या ठिकाणी कचरा टाकला जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच भटकी कुत्री याच ठिकाणी आणून सोडली जात असल्याने ती कचरा रस्त्यावर पसरवतात. यामुळे नागरिकांना कुत्रे चावण्याचा तसेच वाहनांचा पाठलाग केल्याने अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

 

याबाबत नगराध्यक्षांनी समीर धुरी यांच्या सोबत सकारात्मक चर्चा केली. नगरपरिषदेकडून दोन दिवसांत योग्य ती कारवाई करून परिसरातील सर्व कचरा साफ करून देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले.

 

परिसरातील नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने कचरा हटवून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी समीर धुरी यांनी केली.