स्वरालीच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेट

अजित घाडी यांचा सामाजिक उपक्रम

शिरगांव (प्रतिनिधी) :           वाढदिवसाचा आनंद सामाजिक बांधिलकीतून विद्यार्थ्यांसोबत वाटत भाजपाचे कुवळे बूथ अध्यक्ष अजित घाडी यांनी आपली मुलगी स्वराली हिचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. यानिमित्त कुवळे येथील सरस्वती विद्या मंदिरातील अंगणवाडी ते इयत्ता सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळावी, त्यांच्या शैक्षणिक गरजांना हातभार लागावा आणि समाजाप्रती आपली जबाबदारी जपली जावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च न करता विद्यार्थ्यांच्या उपयोगी येणारे साहित्य देण्याचा घाडी यांचा उपक्रम कौतुकास्पद ठरला.

वह्यांचे वाटप झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. वाढदिवसाचा आनंद समाजोपयोगी उपक्रमातून साजरा करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचा प्रेरणादायी संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

यावेळी कुवळे-रेंबवली गावचे सरपंच सुभाष कदम, उपसरपंच सुहास राणे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय साटम, ग्रामपंचायत सदस्य सुभाष थोरबोले, रत्नदीप कुवळेकर, ग्रामस्थ मिथुन लाड यांच्यासह ग्रामस्थ, पालक व शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित होते.

आपल्या मुलीचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपयोगासाठी साजरा केल्याबद्दल अजित घाडी यांचे ग्रामस्थ व पालकांकडून कौतुक होत आहे.