‘अंकुर निवारा केंद्रात’ विनामूल्य व्यावसायिक प्रशिक्षणाचा शुभारंभ

महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम 

सावंतवाडी । प्रतिनिधी :समाज सेवा तसेच आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासोबतच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने आता महिलांच्या आर्थिक सक्षमतेसाठी पाऊल उचलले आहे. संस्थेच्या माध्यमातून “व्यावसायिकदृष्ट्या सक्षम महिला” हा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला असून, सावंतवाडी येथील अंकुर निवारा केंद्रात या विविध व्यावसायिक प्रशिक्षणाचा नुकताच औपचारिक शुभारंभ करण्यात आला.

समाजातील हतबल आणि निराधार महिलांना व्यावसायिक दृष्टिकोन देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे आणि त्यातून स्थानिकांसाठी रोजगार निर्मिती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक सतीश बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे. या संपूर्ण उपक्रमासाठी संस्थेच्या रूपा मुद्राळे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. या सामाजिक उपक्रमात मेहंदी प्रशिक्षक साझिया पडवेकर यांच्यामार्फत सहभागी महिलांना मेहंदीचे प्रशिक्षण दिले जात आहे. याशिवाय विविध हस्तकलेच्या वस्तू बनवण्याचे प्रात्यक्षिक आणि इतर व्यावसायिक कोर्सेस देखील घेतले जात आहेत. हे प्रशिक्षण पुढील आठ ते दहा दिवस चालणार असून, प्रशिक्षणासाठी लागणारे संपूर्ण साहित्य संस्थेच्या वतीने महिलांना विनामूल्य पुरवण्यात आले आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठीही संस्था प्रयत्नशील असणार आहे.

अंकुर निवारा केंद्रातील या कौतुकास्पद उपक्रमाला महिला व बालविकास अधिकारी श्री. बापू शिंगारे यांनी भेट देऊन संस्थेच्या कार्याचे विशेष कौतुक केले. या प्रसंगी कनिष्ठ लिपिक श्री. सिकंदर आढाव, अधिपरिचारिका श्रीमती ऐश्वर्या कल्याणी, स्वयंपाकी श्रीमती वेदिका सावंत, कनिष्ठ काळजीवाहक श्री. तुलसीदास तावडे, सुरक्षा रक्षक श्री. जोशना रेडकर, सुरक्षा रक्षक श्रीमती ज्योती पालव तसेच केअरटेकर निकिता कदम हे मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सचिव समीरा खलील यांच्यासह शरदिनी बागवे, हेलन निबरे, लक्ष्मण कदम आणि रवी जाधव हे सदस्य विशेष सहकार्य करत आहेत.