ॲड. विवेक गोखले यांना सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेकडून श्रद्धांजली

जिल्हा न्यायालयात विशेष रिफरन्स सभेत स्मृतींना उजाळा

सिंधुदुर्ग । प्रतिनिधी :

वैभववाडी तालुक्यातील नाधवडे येथील रहिवासी असलेले तरुण वकील ॲड. विवेक गोखले यांचे वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले. या दुःखद घटनेनंतर सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जिल्हा न्यायालयात विशेष रिफरन्स सभेचे आयोजन करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.

ॲड. विवेक गोखले यांनी आपले कायद्याचे शिक्षण (एलएलबी) रत्नागिरी येथून पूर्ण केले होते. त्यानंतर २०१६-१७ पासून त्यांनी वकिली व्यवसायास सुरुवात केली होती. कणकवली येथील दिवाणी न्यायालय तसेच वैभववाडी न्यायालयात त्यांनी आपल्या उत्तम अभ्यासाच्या जोरावर वकील म्हणून ओळख निर्माण केली होती. वकिली पेशासोबतच ते एक उत्कृष्ट नाटककार, कुशल तबलापटू आणि प्रथितयश कीर्तनकार म्हणूनही सुपरिचित होते. विविध ठिकाणी त्यांच्या कीर्तनाचे कार्यक्रम पार पडले होते आणि आपल्या अष्टपैलू वक्तृत्वाने व कलागुणांनी त्यांनी मोठा चाहता वर्ग निर्माण केला होता.

जिल्हा न्यायालयात आयोजित रिफरन्स प्रसंगी प्रधान जिल्हा न्यायाधीश डॉ. देशपांडे यांच्यासह त्यांचे सर्व सहकारी न्यायाधीश वर्ग, जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. परिमल नाईक, कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा (BCMG) सदस्य ॲड. संग्राम देसाई, जिल्हा सरकारी वकील ॲड. संदीप राणे व त्यांचे सहकारी वकील, तसेच जिल्ह्यातील वकील वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. उपस्थित मान्यवर व वकिलांनी ॲड. गोखले यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना आदरांजली वाहिली. ॲड. गोखले यांच्या अकाली जाण्याने वैभववाडी तालुक्यासह जिल्हाभरातील विधी क्षेत्रात व सांस्कृतिक वर्तुळात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन लहान मुली असा परिवार आहे.