बाल संगोपन रजेसाठीची वयोमर्यादेची अट रद्द
राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री. संजय देसाई यांनी मानले शासनाचे आभार
माडखोल । लखन आडेलकर : दिव्यांग अपत्य असलेल्या राज्य शासकीय महिला कर्मचाऱ्यांना तसेच पत्नी नसलेल्या पुरुष कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे. विशेष बाल संगोपन रजा घेण्यासाठी असलेली अपत्याच्या वयाच्या २२ वर्षांपर्यंतची अट शासनाने रद्द केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय (GR) निर्गमित केला असून, या निर्णयाचे राष्ट्रीय दिव्यांग पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री. संजय देसाई यांनी स्वागत करत शासनाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
शासन निर्णयातील प्रमुख तरतुदी खालीलप्रमाणे आहेत:
• वयोमर्यादा शिथिल: २१ सप्टेंबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार दिव्यांग अपत्याच्या वयाच्या २२ वर्षांपर्यंतच बाल संगोपन रजा घेता येत होती. आता ही वयोमर्यादेची अट पूर्णपणे वगळण्यात आली आहे.
• रजेचा कालावधी: नवीन नियमानुसार, ही विशेष बाल संगोपन रजा एका वेळेस ५ दिवसांपेक्षा कमी कालावधीसाठी घेता येणार नाही.
• कोणाला मिळणार लाभ?: ‘दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६’ अंतर्गत समाविष्ट असलेल्या एकूण २१ प्रकारच्या दिव्यांग प्रवर्गातील अपत्य असणाऱ्या शासकीय महिला कर्मचाऱ्यांना आणि अपत्य असून पत्नी नसलेल्या पुरुष कर्मचाऱ्यांना या रजेचा लाभ मिळणार आहे.
• २१ प्रवर्गांचा समावेश: यामध्ये अस्थिव्यंग, कुष्ठरोग निवारित, मेंदूचा पक्षाघात, शारीरिक वाढ खुंटणे, स्नायूंची विकृती, आम्ल हल्ला पीडित, पूर्णतः व अंशतः अंध, कर्णबधिर, वाचा/भाषा दोष, बौद्धिक अक्षम, विशिष्ट अध्ययन अक्षम, स्वमग्न (Autism), मानसिक आजार, कंपवात, थॅलेसेमिया, सिकल सेल, बहुविकलांग यांसह एकूण २१ दिव्यांग प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.
“दिव्यांग अपत्यांचे संगोपन करताना पालकांना वयाची मर्यादा नसते, उलट वय वाढेल तशी त्यांची अधिक काळजी घ्यावी लागते. शासनाने केंद्र सरकारच्या धर्तीवर वयोमर्यादेची अट रद्द करून दिव्यांग पालक कर्मचाऱ्यांना मोठा आधार दिला आहे. या संवेदनशील निर्णयाबद्दल राज्य शासनाचे मनापासून आभार.”
— श्री. संजय देसाई ( प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय दिव्यांग पार्टी )













