सावंतवाडी । प्रतिनिधी :नेमळे येथील श्री देव कलनाथ देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती अध्यक्षपदी पुन्हा एकदा आत्माराम भिकाजी राऊळ यांची पुढील पाच वर्षांसाठी निर्विवादपणे बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
देवस्थान व्यवस्थापन समिती उपकार्यालय सावंतवाडीचे इन-चार्ज ऑफिसर यांच्याकडून नेमळे ग्रामपंचायतीमार्फत देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती नियुक्ती करण्याबाबत आदेश देण्यात आले होते. या विषयास अनुसरून नेमळे ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच यांच्या उपस्थितीत श्री देवी सातेरी मंदिरात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
नेमळे ग्रामपंचायत सरपंच दीपिका भैरे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेला १०० हून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. या ग्रामसभेत पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी पंधरा जणांची स्थानिक उपसल्लागार समिती कार्यकारिणी घोषित करण्यात आली.
या कार्यकारिणीत अध्यक्षपदी आत्माराम भिकाजी राऊळ, उपाध्यक्षपदी सखाराम शिवराम राऊळ, सचिवपदी राजाराम काशिराम गवस, सहसचिवपदी सुधीर सीताराम घोगळे आणि खजिनदारपदी महादेव गोविंद राऊळ यांची निवड करण्यात आली.
तसेच सदस्य म्हणून उमेश लाडोबा राऊळ, बाळकृष्ण गोपाळ राऊळ, मदन लक्ष्मण राऊळ, महेश शांताराम राऊळ, भाई महादेव राऊळ, सिद्धेश आनंद नेमळेकर, मेघश्याम लक्ष्मण घोगळे, दिलीप परशुराम भैरे, रमेश सीताराम नेमळेकर आणि नंदकिशोर वासुदेव जाधव यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.
या निवडीनंतर उपस्थित नेमळे ग्रामस्थांनी नवनिर्वाचित अध्यक्ष आत्माराम भिकाजी राऊळ, उपाध्यक्ष सखाराम राऊळ यांच्यासह सर्व कार्यकारिणी सदस्यांचे आभार मानून त्यांना पुढील कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.













