नेमळे धनगरवाडी ग्रामस्थ रस्त्यापासून वंचित 

पायपीट कधी संपणार स्थानिक प्रतीक्षेत

सावंतवाडी । प्रतिनिधी :सावंतवाडी तालुक्यातील नेमळे गावातील गावकर कुंभारवाडी येथील धनगरवाडी आजही मूलभूत रस्ते सुविधेपासून वंचित असल्याने येथील ग्रामस्थांना प्रचंड हाल अपेष्टांचा सामना करावा लागत आहे. या वाडीवर जाण्या-येण्यासाठी साधी पायवाटसुद्धा उपलब्ध नसल्याने शाळकरी विद्यार्थी, महिला आणि वृद्धांना रोजची पायपीट करावी लागत आहे.

गावात एखादी व्यक्ती आजारी पडल्यास किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास रुग्णाला मुख्य ग्रामीण रस्त्यापर्यंत तब्बल पाचशे मीटर अंतरावरून उचलून आणावे लागते. तिथून पुढे रिक्षा किंवा इतर वाहनाने रुग्णालयात नेण्याशिवाय पर्याय उरत नाही. या विदारक परिस्थितीमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

नेमळे धनगरवाडीतील या भीषण समस्येकडे लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. निवडणुका आल्या की राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी या वाडीवर मतांचा जोगवा मागण्यासाठी येतात. विविध सरकारी योजनांमधून रस्ता मंजूर करून देण्याची पोकळ आश्वासने दिली जातात. मात्र, निवडणुका संपताच पुढील पाच वर्षे या वाडीतील समस्यांकडे कोणीही ढुंकूनही पाहत नाही. राजकीय फायद्यासाठी आमचा वापर करून फेकून दिले जात असल्याची भावना येथील धनगर समाजाने व्यक्त केली आहे.

गेल्या ३० वर्षांपासून गावातील कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींकडून केवळ फसवणूकच होत आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून रस्त्याच्या या प्रश्नाबाबत नेमका जाब कोणाला विचारायचा आणि आमचा हक्काचा रस्ता कधी होणार, असा सवाल आता धनगरवाडीतील नागरिक विचारत आहेत. लोकप्रतिनिधींच्या आश्वासनांच्या जाळ्यात अडकलेला धनगर समाज आता रस्त्याच्या सुविधेसाठी डोळे लावून वाट पाहत आहे.