देवरूख (प्रतिनिधी):
संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित दादासाहेब सरफरे विद्यालय व कनिष्ठ कला वाणिज्य महाविद्यालयात रामभाजी कर्निव्हल संपन्न झाले. शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना स्थानिक व पारंपारीक रानभाज्यांची ओळख व्हावी, या रानभाज्यांच्या औषधी गुणधर्माची माहिती मिळावी तसेच पारंपारीक खाद्य संस्कृतीचे जतन संवर्धन व्हावे या उद्देशाने संस्था सभागृहात संपन्न झालेल्या या रानभाजी महोत्सव उद्घाटन डॉ. मनोज लोहिया यांच्या हस्ते झाले.
या प्रदर्शनात इयत्ता ५ वी ते ११ वी मधील विद्यार्थ्यानी उत्स्फुर्त सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यानी दक्षिण रत्नागिरी कोकण पट्ट्यात सहज उपलब्ध होणा-या व पावसाळी उपज होणा-या रानभाज्यांची व पाककृतीची आकर्षक मांडणी करुन त्यांच्या औषधी गुणांची माहिती दिली. भारंगी, फोडशी, अळु (तेरी), टाकळा, कुई, करटोळी, फोकळा, आघाडा, पात्री, तिळ पाने, पेवगा, रानसुरण, अळंबी, शेवगा, कुडा शेंग व घोळ इत्यादी भाज्यांच्या पाककृती सर्वांचे लक्ष वेधुन घेत होत्या.
यावेळी उद्घाटक डॉ मनोज लोहिया, प्रमुख पाहुणे माजी सैनिक तथा माभळे सर्कल मंडळ अधिकारी श्री अमर चाळके, शाळा समिती अध्यक्ष श्री दिनेश शामराव जाधव, संस्था सरचिटणीस श्री शरद गोविंद बाईत व प्राचार्य श्री प्रकाश भानुदास विरकर यांनी रानभाज्यांचे जतन संवर्धन आणि त्यांचे आयुर्वेदातील महत्व विषद केले. तसेच पावसाळ्यात रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी या रानभाज्यांचा खासकरुन पारंपारीक आहारामध्ये समावेश केला जातो. या भाज्यांमधील नैसर्गिक औषधी गुणधर्मामुळे या भाज्यांचा नियमित आहारात समावेश केल्यास मधुमेह, पोटदुखी, व खोकला या सारख्या आजारांवर कशा उपयुक्त ठरतात याची माहिती दिली. या रानभाजी महोत्सवाचे परीक्षण सहाय्यक शिक्षिका सौ स्मिता सुभाष हर्डीकर यांनी केले. या वेळी प्रधानमंत्री शालेय पोषण आहार योजनेंतर्गत मध्यान्ह भोजनात इयता ५ वी ते ८ वी मधील सर्व विद्यार्थ्यांनी या रानभाज्यांचा स्वाद घेतला. रानभाजी महोत्सव यशस्वी होण्यासाठी सहाय्यक शिक्षक सौ निलम सचिन पवार, श्री सुनिल पवार, श्री राकेश बांद्रे, श्री सुरेंद्र कुळ्ये यांनी विशेष प्रयत्न केले.













