कामकाजात सुधारणा करा अन्यथा कारवाई करू नगराध्यक्षा एड. हुस्नबानू खलिफेंचा ईशारा
गणेशोत्सवापुर्वी शहरातील सर्व भागातील स्वच्छतेसह पथदिप सुरू करण्याचे आदेश
शहरात महानगर गॅस एजन्सी मार्फत एलपीजी कनेक्शन वाहिनी टाकणेस मंजूरी
राजापूर न. प. सर्वसाधारण सभा
राजापूर प्रतिनिधी: नगर परिषदेच्या बांधकाम विभागाकडून वेळेत विकास कामांची केली जात नसलेली अंदाजपत्रके व पुर्तता, लोकप्रतिनिधींना योग्य माहिती न देणे व उध्दट उत्तरे देणे, तर आरोग्य विभागाकडून शहरातील स्वच्छतेबाबत असलेली बेफिकीरी, शहरातील बंद पथदिप सुरू करण्यात होत असलेली दिरंगाई अशा प्रशासनाच्या एकूणच कारभाराविरोधात खुद्द सभाध्यक्ष व नगराध्यक्षा एड. हुस्नबानू खलिफे यांसह सत्ताधारी व विरोधी गटाच्या नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी आक्रमक पवित्रा घेत या विभागांच्या प्रमुखांना सभागृहात चांगलेच धारेवर धरत विविध कामांबाबत सदस्यांनी जाब विचारला. तर खुद्द नगराध्यक्षांनीही या विभागांच्या बेजबाबदार कारभाराबाबत आलेले अनुभव सांगत तीव्र नाराजी व्यक्त केली. या दोन्ही विभागांनी आपल्या कारभारात सुधारणा करा अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असा सक्त ईशारा यावेळी नगराध्यक्षा एड. हुस्नबानू खलिफे सभागृहात दिला. त
आगामी काळात होणारे गोपाळ काळा, गणेशोत्सव सणांच्या पार्श्वभूमिवर शहरातील सर्व भागातील स्वच्छता तातडीने करा, सर्व गणेशविसर्जन घाटांवर स्वच्छता करून लाईटची सर्व व्यवस्था करा, शहरातील सर्व पथदिप तातडीने सुरू करा असे आदेश यावेळी नगराध्यक्षा एड. हुस्नबानू खलिफे यांनी प्रशासनाला दिले.
यावर प्रशासनाच्या वतीने कार्यालय अधिक्षक जितेंद्र जाधव यांनी या दोन्ही विभागांसह प्रशासनाच्या कामकाजात सुधारणा केली जाईल, लोकप्रतिनिधीं व नागरिकांशी सौजन्याने बोलण्याबाबत संबधीत विभाग प्रमुख व कर्मचारी यांना सुचना दिल्या जातील व सभागृहाने दिलेल्या सुचनांचे काटेकोर पालन केले जाईल अशी ग्वाही यावेळी सभागृहात दिली.
राजापूर नगर परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी नगराध्यक्षा एड. हुस्नबानू खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली बॅ. नाथ पै सभागृहात झाली. यावेळी पाणीपुरवठा व जलनिःसारण समितीने शिफारस केलेल्या राजापूर नगरपरिषदेच्या सर्व पाण्याच्या टाक्या व जॅकवेल येथे सोलर दिवे बसविणे, जल शुध्दीकरण केंद्र व पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे या कामाचे अंदाजपत्रक तयार करणे व अनुषंगिक कामी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांची नियुक्ती करणे अथवा निसर्ग कन्सल्टन्सी, नाशिक यांना मुदतवाढ देणे, राजापूर शहर नळपाणी योजना कामासाठी बिनव्याजी कर्ज घेणे वैशिष्टयपूर्ण योजनेंतर्गत मंजूर कामाचे नावामध्ये बदल करुन सुधारीत प्रस्ताव शासनाकडे सादर करणे, विशेष रस्ता अनुदानातील कामांमधील नावात बदल करुन सुधारीत प्रस्ताव शासनाकडे सादर करणे, आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शहरातील कोसळेल्या संरक्षण भिंतीचा, दरडप्रवण क्षेत्र, भूमीगत विद्युत वाहिनी, वखार, बंधारा प्रस्ताव शासनाकडे सादर करणे, बांधकाम विभागाकडील कामकाजाकरिता तात्पुरत्या स्वरुपाची बांधकाम अभियंता सेवा पुरविणे, राजापूर शहरात महानगर गॅस एजन्सी मार्फत एलपीजी (LPG) कनेक्शन वाहिनी टाकणे, गणेशोत्सव २०२६ गणेश विसर्जन वेळी गणेश घाट येथे सुशोभीकरण करणे व इतर आवश्यक विद्युत व्यवस्था उपलब्ध करून देणे याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांकडून योग्य माहिती व उत्तरे दिली जात नसल्याचा मुद्दा नगरसेविका उर्मिला बाकाळकर यांनी सभागृहात मांडला. यावर शिवसेना गटनेते एड. राहुल तांबे, दिलीप अमरे, दिलीप चव्हाण, प्रेरणा नार्वेकर, सौरभ खडपे यांसह सर्वच सदस्यांनी बांधकाम विभागाच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त केली. सत्ताधारी गटातील सदस्यांनीही याबाबत सहमती दर्शवत बांधकाम विभागाच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त केली. या विभागाकडून वेळेत अंदाजपत्रके तयार केली जात नाहीत, प्रस्ताव वेळेत पाठविले जात नाहीत असा मुद्दाही यावेळी सदस्यांनी सभागृहात तर बांधकाम विभागाच्या बेजबाबदार कारभाराचा खुद्द नगराध्यक्षांना आलेला अनुभव त्यांनी सभागृहात सांगितला. तर आरोग्य विभागाकडून शहरात स्वच्छतेबाबत योग्य कार्यवाही होत नसल्याचा मुद्दाही नगरसेवक सुभाष बाकाळकर यांनी उपस्थित केला. तर शहरातील पथदिप व्यवस्थेबाबत हा विभाग आणि प्रशासन गंभीर नसल्याचा मुद्दा गटनेते एड. जमिर खलिफे यांनी सभागृहात मांडला. या दोन्ही विभागांच्या कारभाराविरोधात सभागृहात सर्वच नगसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर नगराध्यक्षांनी कारभारात सुधारणा करा अन्यथा कारवाई करू असा ईशारा दिला.
जवाहर चौकातील पिकअप शेडमधील एक गाळा राजापूर पोलीसांना तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाटयगृह व जवाहर चौकातील पिकअपशेड दुरूस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत अन्य विविध विषयांवर झालेल्या चर्चेत उपनगराध्यक्ष विनय गुरव, आरोग्य सभापती सुलतान ठाकूर, नगरसेवक महेश शिवलकर, सौरभ पेणकर, सिध्दांत जाधव, नगरसेविका सुयोगा जठार, साजिया काझी, सान्वी रावण, अमिना गडकरी, जानवी वादक, शबाना मुल्ला, नेहा तानवडे आदींनी सहभाग घेत आपली मते मांडली. सभेच्या प्रारंभी माजी नगसेवक कै.दिलीप कोरगावकर यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
Home महत्वाच्या बातम्या बांधकाम, आरोग्य विभागाच्या बेजबाबदार कारभाराविरोधात सभागृहात नगराध्यक्षांसह सत्ताधारी व विरोधी नगरसेवक आक्रमक













