गडकिल्ले बनविणे स्पर्धेत कुडाळकरांचा उत्स्फूर्त सहभाग; मुरुड जंजिरा प्रथम

राजगड द्वितीय, हरिहर गडाच्या प्रतिकृतीला तृतीय क्रमांक; शिवसेना कुडाळ शहराचा ऐतिहासिक वारसा जपण्याचा उपक्रम

कुडाळ : छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास, महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे वैभव आणि दुर्गसंवर्धनाचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने शिवसेना कुडाळ शहराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गडकिल्ले बनविणे स्पर्धा २०२६ ला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत शहरातील दहा स्पर्धकांनी सहभाग घेत विविध ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या आकर्षक प्रतिकृती साकारल्या.

 

या स्पर्धेत मुरुड जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती साकारलेल्या शिवम शिंदे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. राजगड किल्ल्याची प्रतिकृती साकारलेल्या नरसिंह महापुरुष मित्रमंडळ, लक्ष्मीवाडी यांनी द्वितीय, तर हरिहर गडाची प्रतिकृती साकारलेल्या केळबाई मित्रमंडळाने तृतीय क्रमांक मिळविला.

 

याशिवाय रायगड किल्ल्याची प्रतिकृती अमित कारेकर, सिंहगड श्लोक वेदक, प्रतापगड गोविंद घाडी, विजयदुर्ग घाडीवाडी मित्रमंडळ, मुरुड जंजिरा महेश ओटवणेकर, विजयदुर्ग विधी जळवी आणि राजगड निनाद नाईक यांनी साकारले. स्पर्धकांनी आपल्या कलाकृतींमधून ऐतिहासिक वारशाप्रती असलेली आस्था, कल्पकता आणि मेहनतीचे दर्शन घडविले.

 

स्पर्धेच्या परीक्षणावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी उपस्थित राहून स्पर्धकांच्या कलाकृतींची पाहणी केली. यावेळी मालवण नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष दीपक पाटकर उपस्थित होते. संदीप चिऊलकर आणि साळसकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. गडांच्या प्रतिकृतींची रचना, मांडणी, कलात्मकता आणि ऐतिहासिक वैशिष्ट्ये या निकषांवर परीक्षण करण्यात आले.

 

यावेळी शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे, माजी उपनगराध्यक्ष आबा धडाम, माजी नगरसेवक राकेश कांदे, शिवसेना शाखाप्रमुख योगेश काळप, प्रथमेश कांबळी, निलेश उर्फ बंड्या शिरसाट, राजाराम गडेकर, संदेश सावंत यांच्यासह शिवसैनिक आणि नागरिक उपस्थित होते.

 

या स्पर्धेच्या माध्यमातून बालकांपासून तरुणांपर्यंतच्या पिढीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, स्वराज्याची प्रेरणा आणि महाराष्ट्राच्या गड-किल्ल्यांविषयी अभिमान निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ऐतिहासिक वारशाची ओळख करून देतानाच गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम कुडाळ शहरात विशेष आकर्षण ठरला.