उपचारादरम्यान बारावीच्या विद्यार्थीनीचा मृत्यू

वैभववाडी तालुक्यात हळहळ

वैभववाडी प्रतिनिधी :
कोकिसरे गावठणवाडी येथील बारावीमध्ये शिकणाऱ्या कु. करुणा प्रकाश वळंजू (वय १७) या विद्यार्थीनीचे उपचारादरम्यान ओरोस जिल्हा रुग्णालयात निधन झाले. तिच्या आकस्मिक निधनाने कोकिसरेसह वैभववाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
करुणा वळंजू ही वैभववाडी येथील हेमंत केशव रावराणे विद्यालयात इयत्ता बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. मागील दोन दिवसांपासून ती सर्दी व तापाने आजारी होती. तिच्यावर वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती नाजूक झाल्याने तिला त्याच दिवशी पुढील उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
ओरोस येथे तिच्यावर उपचार सुरू असतानाच प्रकृती अधिक खालावली. तिला पुढील उपचारासाठी बांबोळी, गोवा येथे नेण्याचा सल्ला नातेवाईकांना देण्यात आला. मात्र, बांबोळी येथे नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
करुणाच्या अचानक निधनामुळे कुटुंबीय, नातेवाईक, शिक्षक व मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या पश्चात आई-वडील, बहिण, भाऊ, काका-काकी असा परिवार आहे.