व्यापारी वर्गाने केले पोलिसाचे अभिनंदन
दोडामार्ग l प्रतिनिधी : नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात संपूर्ण दोडामार्ग शहरासहित विशेषतः दोडामार्ग बाजारपेठेत वाहतुकीचे योग्य नियोजन केल्याब द्दल नागरिक, व्यापारी वगैरेनी दोडामार्ग पोलिसांचे विशेष अभिनंदन केले. मात्र शहरात मोकाट गुरे मात्र रस्त्यावर बसून असल्याने कायमच वाहतुकीस अडथळा ठरत आहे
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या दोडामार्ग शहरातील बाजारपेठ ही संपूर्ण दोडामार्ग तालुक्यासोबत गोवा राज्याच्या सीमे वरील गावांसाठी सुद्धा फार महत्त्वाची बाजारपेठ आहे . दोडामार्ग लगतच्या गोवा राज्यामधून तेथील डिचोली, बारदेस तालुक्यातील गावागावा मधील ग्राहक, तसेच अनेक फिरते शिवाय घाऊक व किरकोळ विक्रेते यांची चतुर्थीच्या अगदी पंधरा दिवस अगोदर पासून बाजारपेठेत जास्त ये जा सुरू असते. शहरातील चारही प्रमुख राज्य मार्गावर विस्तीर्णपणे पसरत चाललेल्या दुकाने, व्यापार समूह सुपर मार्केट ठिकाणी तसेच पै पाहुणे यांच्याकडेही जाण्या येण्यासाठी दुचाकी तसेच चारचाकी वाहनांची रांग लागलेली असते. साहजिकच त्यामुळे कधी कधी वाहतुकीवर ताण पडतो व ट्रॅफिक जॅम ची समस्या उत्पन्न होते. मात्र दोडामार्ग पोलिसांकडून चतुर्थीच्या पूर्वीपासून वाहतुकीचे विशेष नियोजन केले जाते. यंदा देखील पोलिसांनी विशेषतः गोवा रोड सहित अन्य मार्गावर वाहतुकीचे चोख नियोजन केले होते. त्यामुळे ट्रॅफिक जॅम ची समस्या उद्भवली नाही . त्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिक ,व्यापारी यांनी दोडामार्ग पोलिसांचे विशेष अभिनंदन केले. पोलीस निरीक्षक हेमचंद खोपडे यांची भेट घेऊन पोलीस तसेच होमगार्ड यांच्या बद्दल कौतुकास्पद भावना सर्वांनी व्यक्त केल्या. यावेळी दोडामार्ग तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष सागर शिरसाट, संतोष नानचे, व्यापारी पांडुरंग बोर्डेकर ,शामसुंदर चांदेलकर , सुदेश मळीक, प्रकाश काळबेकर, शुभम पांचाळ , फोंडू हडीकर, ओंकार पेडणेकर, सिद्धू कासार, वैभव इनामदार आदी उपस्थित होते.












