रत्नागिरी चित्र शाळेतील मूर्ती निघाल्या नाशिकला

रत्नागिरी / वार्ताहर:
” हा छंद जीवाला लावी पिसे” ही काव्य ओळ लहानपणापासूनच मनात घर करून राहिल्याने केवळ व्यवसाय म्हणून न पाहता आपल्या अद्भुत कलेच्या कौशल्याने श्री गणेशाच्या मूर्ती घडविण्याचा छंद जोपासण्याचे काम रत्नागिरी फगरवठार येथील प्रसिद्ध मूर्तिकार श्री वामन विठ्ठल सुवरे गेली 35 वर्षे मोठ्या श्रद्धेने गणेश मूर्ती साकारण्याचे काम करीत आहेत आज रत्नागिरीचे भूषण म्हणजे रत्नागिरीतील श्री वामन सुवरे मूर्तिकार यांच्या चित्र शाळेतील मूर्तींना नाशिक येथे मागणी वाढली आहे.
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे त्यामुळे गणेश मूर्ती साकारण्याचे काम अतिशय वेगाने सुरू आहे रत्नागिरीत श्री गणेश मूर्तिकार आपापल्या कारखान्याच्या नियोजनात गुंतलेले आहेत. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या तिन्ही जिल्ह्यात 4000 दरम्यान चित्रशाळा आहेत .यातील काही चित्रशाळांचा कानोसा घेतला असता यावर्षी विविध स्वरूपातील गणेश मूर्ती दिसून येत आहेत. सध्या बालाजी रूपातील, स्वामी समर्थ रूपातील, विठ्ठल रूपातील तसेच अन्य काही रूपे धारण करणाऱ्या गणेश मुर्त्या गरुडारुढ, मुषकारुढ आदी गणेश मूर्तींना यावर्षी जास्त मागणी असल्याचे रत्नागिरीतील मूर्तिकार श्री वामन सुवरे यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली.
यंदा जरी गणेश मूर्तींच्या मातीच्या किमती वाढल्या असल्या तरी देखील सर्वांनाच परवडेल असा उद्देश समोर ठेवून प्रत्येकाला आवडीची श्री गणेश मूर्ती देण्याचा माझा प्रयत्न असतो असे मूर्तिकार श्री वामन सुवरे यांनी सांगितले.
गणेशोत्सव काही दिवसांवर आलेला असल्याने मूर्ती कामांच्या रंगकाम चालू आहे मूर्तिकामे अंतिम टप्प्यात चालू आहेत अशा वेळेला लोड शेडिंग मुळे लाईट जाते आणि त्यामुळे मूर्ती कामे करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे ही एक खंत मूर्तिकार वामन सुवरे यांनी व्यक्त केली. आज या चित्र शाळेमध्ये मूर्तिकार वामन सुवरे यांच्यासोबत दहा-बारा कामगार देखील तेथे काम करत आहेत. त्यामुळे अनेक बेरोजगार तरुणांना देखील उत्तम प्रकारे रोज या ठिकाणी मिळत आहे.
गेली अनेक वर्षे सुबक मूर्ती आकर्षक रंंगरंगोटी यासाठी अनेक बक्षिसे मूर्तिकार वामन सुवरे यांना मिळालेली आहेत तरीदेखील गणेश मूर्तिकार म्हणून जनमानसात असलेली ख्याती हाच माझा मोठा पुरस्कार असे गणेश मूर्तीकार श्री.वामन विठ्ठल सुवरे विनम्रतेने कबूल करतात.