बांदा येथे गावठी बंदूक व ९ काडतुसांसह तरुण जेरबंद

मुख्य पुरवठादारालाही अटक : बांदा पोलिसांची कारवाई

गोवा कनेक्शनने बेकायदेशीर शस्त्र रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता

बांदा । प्रतिनिधी :
​बांदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असनीये येथे पोलिसांनी धडक कारवाई करत गावठी बनावटीची बंदूक आणि ९ जिवंत काडतुसांसह एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. जयेंद्र अनिल सावंत (वय २७, रा. असनीये) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. सावंतवाडी पोलिसांनी असनीये परिसरात बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगल्याची अत्यंत गोपनीय माहिती बांदा पोलिसांना दिली होती. या माहितीच्या आधारे बांदा पोलीस सहाय्यक निरीक्षक पंकज शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुरुवारी सकाळी असनीये येथे छापा टाकून जयेंद्र सावंत याच्याकडून गावठी बनावटीची काडतूसची बंदूक आणि ९ जिवंत काडतुसे जप्त करत त्याच्याविरुद्ध बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
​या अटकेनंतर पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत जयेंद्रला बंदूक पुरवणाऱ्या मुख्य संशयिताचे नाव समोर आले. पोलिसांनी तत्काळ चक्रे फिरवून बंदूक पुरवठादारालाही बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, तपासाच्या गोपनीयतेमुळे पोलिसांनी अद्याप मुख्य पुरवठादाराचे नाव जाहीर केलेले नाही.
आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित संशयिताने ही बंदूक आणि काडतुसे नेमकी कुठून आणली, तसेच बांदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत किंवा परिसरात अन्य कोणाला अशा बंदुकांची विक्री केली आहे का, याचा कसून तपास पोलीस करत आहेत.
​दरम्यान, या तपासाचे धागेदोरे शेजारील गोवा राज्याशी जोडले गेले असून संशयित पुरवठादाराकडून मिळालेल्या सुगाव्याच्या आधारे बांदा पोलिसांचे विशेष पथक गोवा हद्दीत रवाना झाले आहे. बांदा पोलीस हद्दीतही काही जणांना अशा बंदुका पुरवण्यात आल्याची चर्चा परिसरात सुरू असून, पोलीस आता या शस्त्रास्त्रांच्या मुळापर्यंत पोहोचून बंदूक बनविण्याच्या आणि विक्रीच्या संपूर्ण बेकायदेशीर रॅकेटचा पर्दाफाश करण्याच्या तयारीत आहेत. या प्रकरणात लवकरच आणखी काही संशयितांना ताब्यात घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चौकट

सावंतवाडीतही छापेमारी सुरु : अनेकजण रडारवर

मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार देवसु येथील बंदूका हस्तगत प्रकरणानंतर आता सावंतवाडी पोलिसांनी इतर ठिकाणीही छापेमारी सुरू केली आहे. काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तर शहरालगतच्या एका गावातून बेकायदेशीर बंदुका बनविणाऱ्या एका मेस्त्रीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. याबाबत सावंतवाडी पोलिसांशी संपर्क साधला असता चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

*सावंतवाडीतही छापेमारी सुरु : अनेकजण रडारवर*

मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार देवसु येथील बंदूका हस्तगत प्रकरणानंतर आता सावंतवाडी पोलिसांनी इतर ठिकाणीही छापेमारी सुरू केली आहे. काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तर शहरालगतच्या एका गावातून बेकायदेशीर बंदुका बनविणाऱ्या व पुरवठा करणाऱ्या एका मेस्त्रीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. मात्र, तपासाच्या गोपनीयतेमुळे पोलिसांनी अद्याप मुख्य पुरवठादाराचे नाव जाहीर केलेले नाही. याबाबत सावंतवाडी पोलिसांशी संपर्क साधला असता चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. एकंदरीतच हे मोठे रॅकेट असून यात अनेक जण पोलिसांच्या रडारवर आहेत.