देवरूख कनिष्ठ महाविद्यालयात ‘श्रावण सरी’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

देवरूख (प्रतिनिधी):

देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागातर्फे ‘श्रावण सरी’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. श्रावण महिन्याचे निसर्गसौंदर्य, सण-उत्सव, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक मूल्ये यांचा सुरेख मिलाफ या कार्यक्रमातून अनुभवायला मिळाला. श्रावण महिन्याचे संस्कृतीशी, पर्यावरणाशी आणि निसर्गाशी असलेले नाते विविध कलाविष्कारांतून विद्यार्थ्यांनी सुंदररीत्या सादर केले.

कार्यक्रमाची सुरुवात श्रावणातील सण-उत्सवांचे महत्त्व सांगणाऱ्या लघुनाटिकेने झाली. या लघुनाटिकेतून नागपंचमी, रक्षाबंधन, दहीहंडी तसेच श्रावणातील विविध परंपरा आणि संस्कार यांचे महत्त्व प्रभावीपणे मांडण्यात आले. या लघुनाटिकेत विद्यार्थ्यांनी ‘श्रावणसरी’, ‘श्रावणमास आला’, ‘असा रंगारी श्रावण’, ‘श्रावणमासी हर्ष मानसी’ आदी श्रावण गीतांवर आधारित कवितांचे मनोहारी सादरीकरण केले. ‘हसरा, नाचरा, जरासा लाजरा’ या गीतावरील सृष्टी सावंत व रिद्धी गुरव यांनी सादर केलेल्या नृत्याने कार्यक्रमात विशेष रंगत आणली. श्रावणी भडेकर हिने सुंदर आवाजात गायलेल्या ‘हसरा, नाचरा, जरासा लाजरा’ या गीताला विद्यार्थी प्रेक्षकांनी प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली. तसेच विद्यार्थिनींच्या समूहाने मंगळागौरीच्या पारंपरिक कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडविले.

 

कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. देवयानी जोशी यांनी केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सीमा शेट्ये यांनी प्रास्ताविकातून ‘श्रावण सरी’ कार्यक्रमामागील संकल्पना आणि उद्देश स्पष्ट केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. आर्य अणेराव यांनी केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि विविध सांस्कृतिक कलाविष्कारांमुळे ‘श्रावण सरी’ हा कार्यक्रम निसर्ग, संस्कृती, परंपरा आणि नात्यांचा सुंदर संगम ठरला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देतानाच महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यात कार्यक्रम यशस्वी ठरला.