प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेबाबत आ. शेखर निकम यांना सविस्तर माहिती

महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून योजनेची माहिती
 अधिकाधिक नागरिकांपर्यंत योजना पोहोचविण्यावर भर

चिपळूण (प्रतिनिधी) : चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांना ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’ संदर्भात महावितरण चिपळूण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी महावितरण चिपळूण विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अनिलकुमार डोंगरे आणि कार्यकारी अभियंता धनंजय भामरे यांनी योजनेची कार्यपद्धती, नागरिकांना मिळणारे लाभ तसेच सौरऊर्जा निर्मितीचे महत्त्व याबाबत माहिती दिली. केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या योजनेचा उद्देश घरांच्या छतावर सौरऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देणे हा आहे.
सौरऊर्जेच्या माध्यमातून घरगुती विजेचा खर्च कमी करण्यास मदत होण्याबरोबरच स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने ही योजना महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील पात्र नागरिकांनी योजनेची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा, यासाठी जनजागृती करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. यावेळी योजनेसाठी आवश्यक प्रक्रिया, सौरऊर्जा प्रणाली बसविण्याची पद्धत, महावितरणकडून करण्यात येणारी कार्यवाही आणि नागरिकांना उपलब्ध असलेल्या सुविधांबाबत अधिकाऱ्यांनी आमदार शेखर निकम यांना माहिती दिली. ग्रामीण तसेच शहरी भागातील अधिकाधिक कुटुंबांपर्यंत योजनेची माहिती पोहोचविण्यासाठी स्थानिक पातळीवर जनजागृती करणे आवश्यक असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
आमदार शेखर निकम यांनी मतदारसंघातील नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा, यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याची भूमिका व्यक्त केली. सौरऊर्जेचा वापर वाढल्यास पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करण्यास तसेच पर्यावरण संवर्धनास हातभार लागू शकतो. त्यामुळे या योजनेबाबत नागरिकांमध्ये योग्य माहिती पोहोचविण्याची गरज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार) पक्षाचे पदाधिकारी तसेच महावितरण चिपळूण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. योजनेची प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी महावितरण व स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय ठेवण्याबाबतही यावेळी सकारात्मक चर्चा झाली.