पाचल ग्रामपंचायतीचे काम कौतुकास्पद
पाचल वार्ताहर: राजापूर तालुक्यात राजापूरनंतर विकसित होणारी पाचल ही दोन नंबरची बाजारपेठ आहे. त्यामुळे पाचलच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजनांबरोबरच आपण तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भरीव विकास निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. भविष्यातही पाचलच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही आमदार किरण सामंत यांनी पाचलवासीयांना दिली.
शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून दिव्यांग व गरजू लाभार्थ्यांना विविध साहित्याचे वाटप करण्याचा पाचल ग्रामपंचायतीच्या उपक्र माचेही आ. सामंत यांनी कौतुक केले.
पाचल ग्रामपंचायतीच्या वतीने शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून दिव्यांग व गरजू लाभार्थ्यांना विविध साहित्याचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आ. सामंत बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर सभापती नंदिनी कदम, सरपंच बाबालाल फरास, उपसरपंच आत्माराम सुतार, पंचायत समिती सदस्य अपेक्षा मासये, समिक्षा वाफिलकर, प्रसाद मोहरकर, माजी सरपंच अशोक सक्रे, ग्रामपंचायत सदस्य सिध्दांर्थ जाधव, संजय पाथरे, तंटामुक्त अध्यक्ष विनायक खानविलकर, पाचल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आण्णा पाथरे, माजी पोलीस पाटील रवींद्र खानविलकर,आप्पा साळवी, विभाग प्रमुख शैलेश साळवी, अमर जाधव, सुरेश ऐनारकर, संदीप बारसकर आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पावस-ओणी-पाचल ते विठ्ठा बाजार या रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून यासाठी साडेतीनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे यावेळी आ. सामंत यांनी सांगितले. तर तळवडे-पाचल या पुलासाठी देखील निधी प्राप्त झाला असून, पांगरी गावच्या पुनर्वसनासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच भारत माता प्रभाग संघासाठी एक कोटी रुपये मंजूर झाल्याचे आमदार सामंत यांनी यावेळी जाहीर केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत सरपंच बाबालाल फरास यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिध्दार्थ जाधव यांनी केले.













