बंधन हेल्मेटचे रक्षण जीवनाचे ; पोलिसांकडून रक्षाबंधनाचा ‘सुरक्षा बॅण्ड

रक्षाबंधनाचा धागा, सुरक्षित प्रवासाचा मार्ग

सावंतवाडी पोलिसांचा ‘गांधी चौक’ येथे अनोखा उपक्रम

सावंतवाडी:सण-उत्सवाच्या आनंदाला अपघाताचे गालबोट लागू नये आणि रस्त्यावरून धावणाऱ्या प्रत्येक वाहनाला सुरक्षिततेचे कवच लाभावे, या उदात्त हेतूने सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने ‘रस्ता सुरक्षा अभियान’ अंतर्गत एका संवेदनशील आणि अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. “बंधन हेल्मेटचे, रक्षण जीवनाचे; बंधन सिटबेल्टचे, रक्षण जीवनाचे” असा आत्मीयतेचा आणि सुरक्षेचा संदेश देत पोलिसांकडून गांधी चौक परिसरातून जाणाऱ्या बेफिकीर वाहनधारकांना शिस्तीचे धडे देण्यात आले.

 

शहरातील मध्यवर्ती गांधी चौक येथे विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या आणि सीटबेल्ट न लावता चारचाकी धावणाऱ्या चालकांना थांबवून पोलिसांनी दंडा ऐवजी आपुलकीची वाट दाखवली. पोलिसांच्या हाती दंडात्मक पावतीऐवजी रक्षाबंधनाचा ‘सुरक्षा बॅण्ड’ आणि तोंडावर लाडूचा गोडवा पाहून नियम मोडणारे वाहनधारक काही क्षण चक्रावून गेले. सणाच्या पाश्र्वभूमीवर, “घरी तुमची कोणीतरी वाट पाहत आहे, त्यामुळे वेगावर नियंत्रण ठेवा आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करा,” अशी आर्जवी साद या वेळी पोलिसांकडून घालण्यात आली.

 

या उपक्रमाची पार्श्वभूमी स्पष्ट करताना सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी कायदा आणि भावनांची सुरेख सांगड घातली. “रक्षाबंधन हा केवळ एक सण नसून परस्परांच्या रक्षणाचा दिलेला शब्द असतो. म्हणूनच, आजच्या दिवशी प्रत्येक चालकाला त्याच्या कुटुंबाची आणि अमूल्य आयुष्याची जाणीव करून देणे हे आमचे कर्तव्य होते. हेल्मेट आणि सीटबेल्ट हे केवळ कायद्याचे बंधन नसून ते तुमच्या आयुष्याचे रक्षणकवच आहे. आज आम्ही प्रेमाने आणि लाडूचा गोडवा देऊन ही जाणीव करून दिली आहे, मात्र उद्यापासून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा सूचक इशाराही त्यांनी या प्रसंगी दिला.

 

गांधी चौक येथे पार पडलेल्या या संवेदनशील उपक्रमात सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्यासह माधुरी मुळीक, निलेश परब, आबा पिळणकर, अमित राऊळ, निलेश नाईक, मयुर सावंत, पोलीस पाटील संदेश राऊळ, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष धर्मेंद्र सावंत आणि सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव हे प्रमुख उपस्थित होते. कायद्याच्या कडक चौकटीला सामाजिक भान आणि कौटुंबिक आत्मीयतेची जोड देणारा सावंतवाडी पोलिसांचा हा उपक्रम उपस्थितांचे आणि शहरवासीयांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.