रत्नागिरी : रत्नागिरीकरांच्या उपस्थितीने पूर्णतः भरलेले नाट्यगृह… प्रत्येक स्पर्धकाला उत्साहपूर्ण मिळणारा पाठिंबा… आणि क्षणाक्षणाला वाढत जाणारी उत्कंठा… अगदी जोशात झालेल्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत ठाण्याच्या समीर गायकवाड याने हजारो रत्नागिरीकरांच्या उपस्थितीत मानाचा ‘महाराष्ट्र श्री ‘ हा किताब पटकावला आणि उपस्थितांनी एकच जल्लोष केला.
स्वामी माऊली बहुद्देशीय सेवा चॅरिटेबल ट्रस्ट पुरस्कृत आणि महाराष्ट्र राज्य हौशी शरीर सौष्ठव संघटना तसेच रत्नागिरी जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटना यांच्याकडून राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या वाढदिनानिमित्त ७२ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन रत्नागिरीतील स्वा. सावरकर नाट्यगृह येथे करण्यात आले होते. रविवार २५ डिसेंबर आणि सोमवार २६ डिसेंबर अशी दोन दिवस ही स्पर्धा घेण्यात आली. एकूण सहा गटात झालेल्या या स्पर्धेत राज्यभरातील साडेतीनशे स्पर्धक सहभागी झाले होते. प्रत्येक गटातील स्पर्धा अत्यंत रोमहर्षक झाली. दोन्ही दिवस प्रचंड प्रतिसादात स्पर्धा पार पडली. सोमवार २६ डिसेंबर रोजी स्पर्धेचा समारोप कार्यक्रम करण्यात आला.
या स्पर्धेतील अत्यंत मानाचा समजला जाणारा महाराष्ट्र श्री हा किताब ठाण्याच्या समीर संजय गायकवाड याने पटकावला. अत्यंत चुरशी अशा स्पर्धेत समीर गायकवाड विजयी ठरला. समीर गायकवाड याला रोख रुपये ५१००० आणि मनाची ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते महाराष्ट्र श्री गायकवाड याचा सन्मान करण्यात आला. तर महाराष्ट्र किशोर हा किताब ईश्वर प्रदीप ढोलम याने पटकावला. महाराष्ट्र उदय हा किताब अजिंक्य पवार याने पटकावला. महाराष्ट्र श्रीमान हा किताब स्वप्नील सुरेश वाघमारे याने पटकावला. महाराष्ट्र फिटनेस हा किताब विश्वनाथ पुजारी तर महाराष्ट्र कुमार हा किताब जगन्नाथ जाधव याने पटकावला. या सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम २१ हजार आणि ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. दोन्ही दिवस या स्पर्धेला रत्नागिरीकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला.