चिपळूणनजीक दोन एस.टी. बसेसची समोरासमोर धडक: २४ प्रवासी जखमी

चिपळूण (प्रतिनिधी):- कळंबस्ते-धामणंद मार्गावरील आंबडस- खांदाट गवळवाडी सीमेवर दोन एसटी बसेसची समोरासमोर जोरदार धडक होऊन २४ प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये चालक वाहकाचा देखील समावेश आहे. या अपघाताची स्थानिक ग्रामस्थांना माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने उपचारासाठी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवले.

हा अपघात शनिवारी दुपारी ३.३५ वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातानंतर जखमींच्या नातेवाईकांनी कामथे उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांनी जखमींची विचारपूस करीत अपघाताची माहिती जाणून घेतली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

या अपघातात जयवंत कृष्णाजीराव पालांडे (५७, रा. तळवटपाली, नितेश महादेव धाडवे ( ४५, रा.पेढे), अनंत दाजी उतेकर (७२, कासई), श्रुती सुनील जगम (२०, तळवटपाली), सोनल सुनील खेतले (४५, रा. केळणे), तुकाराम लक्ष्मण हिरवे (५७, रा. काडवली), रुद्र विजय जंगम ( १४, रा. धामणंद ) पार्थ जितेंद्र नांदगावकर (१७, रा. काडवली), वृषाली रुपेश तांबे (३०, रा. धामणंद), स्वरा सुरेश धनावडे (२४, धामणंद ), सियान जयेश कदम (१०, रेहेळ), एस. टी. चालक नागेश रामचंद्र कदम ( ५१, रा. माखजन), संजय गोपीनाथ आडे (४२, रा. चिपळूण ), मुकुंद विजय आडे ( ४६, मनोहर चव्हाण( ७५, रा. साखर), सुनिता पांडुरंग सनगरे (२५, रा. उक्ताड ), जानकी शांताराम गोरखे ( ७०, रा. काडवली), विठ्ठल गुणाजी धाडवे ७३, रा.काडवली), सुहासिनी संतोष शिंदे ( ४०, रा. आंबडस), ओम मंगेश शिंदे ( १८, रा. आंबडस), विद्या विकास भुवड (५०, रा. दळवटणे), सुनंदा अनंत कदम (६०, रा. रेहेळ),विजया विजय जंगम (४२, रा. धामणंद) अशी जखमींची नावे आहेत.

याबाबत मिळालेल्या चालक नागेश रामचंद्र कदम (५१, रा. माखजन, संगमेश्वर) हे शनिवारी दुपारी २.३० वाजता चिपळूण एस. टी. आगारातून चिपळूणहून चोरवणे अशी एसटी प्रवाशांना घेऊन निघाले. तर चालक राहुल लक्ष्मण पवार आपल्या एस. टी. प्रवाशांना घेऊन कासईहुन चिपळूणकडे भरधाव वेगाने निघाले होते. आंबडस – खांदाट गवळवाडी सीमेवर आले असता दोन्ही एस.टी. बसेसची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघाताची तीव्रता होती की दोन्ही एस.टी. गाड्यांच्या दर्शनी भागाच्या काचा फुटून गेल्या. अचानकपणे घडलेल्या अपघातामुळे दोन्ही एस.टी. बसेस मध्ये प्रवाशांनी एकच आरडाओरड केली. या अपघाताने प्रवाशी घाबरून गेले. या अपघातात प्रवासी पुढील सिटच्या लोखंडी दांडीवर आदळले. यामुळे काही प्रवाशांच्या दाताला दुखापत झाली तर काही प्रवाशांचे दात तुटून पडले. तर काही प्रवाशांच्या पायाला, कांहींच्या डोक्याला दुखापत झाली. अपघाताची माहिती स्थानिक ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालय उपचारासाठी हलवले तसेच या अपघाताची माहिती पोलीस आणि एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिली.

*उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांची कामथे उपजिल्हा रुग्णालयात धाव; जखमींची विचारपूस*

यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांच्यासह चिपळूण एस. टी. आगार व्यवस्थापक रणजीत राजेशिर्के तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, अपघातस्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. अपघाताची माहिती जाणून घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. बेले यांनी कामथे उपजिल्हा रुग्णालय गाठले. यावेळी जखमी प्रवाशांची विचारपूस केली. या अपघाताची माहिती मिळताच जखमींच्या नातेवाईकांनी देखील कामथे उपजिल्हा रुग्णालय गाठले. यामुळे कामथे उपजिल्हा रुग्णालय परिसरात गर्दी झाली होती. तर पोलीस उपनिरीक्षक विकास निकम, पोलीस कर्मचारी विनोद आंबेरकर आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी जखमींकडून अपघाताची माहिती घेतली.

*कामथे रुग्णालयात जखमींवर उपचार*

एस.टी. अपघातातील जखमींवर कामाचे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ उपचार केले. यामुळे अपघातग्रस्त जखमींना थोडा दिलासा मिळाला. मात्र, अचानक घडलेल्या अपघातामुळे जखमी प्रवासी भयभीत झाले होते. या अपघातात एस. टी. बसेसमध्ये विद्यार्थी, लहान मुले होती. मात्र, त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

*लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांची कामथे उपजिल्हा रुग्णालयात धाव!*

या अपघाताची माहिती मिळताच लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी कामथे उपजिल्हा रुग्णालयात धाव अपघातग्रस्त जखमींची विचारपूस केली. यावेळी शिवसेना खेड तालुकाप्रमुख अरविंद चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कृष्णा लांबे, चिपळूण पंचायत समितीच्या सदस्या सौ. मेघा इंगवले, रवींद्र पालांडे, ओंकार चव्हाण, रुपेश इंगवले, काडवली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य मनोज काजवे, वसंत रामाणे, दीपक नवेले, चंद्रकांत कदम शिवसेना चिपळूण तालुकाप्रमुख दिलीप चव्हाण, भाजपचे जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य बावाशेठ महाडिक, चिपळूण शहर मंडल अध्यक्ष व नगरसेवक शशिकांत मोदी, भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांचे स्वीय सहायक गुलजार गोलंदाज आदींनी पोलीस अधिकारी व कामथे उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

चौकट

*कासई ते चिपळूण एस.टी.चा चालक भरधाव वेगाने चालवित होता गाडी.; जखमी प्रवाशांची माहिती*

कासई ते चिपळूण अशी एस.टी. बस घेऊन निघालेले चालक राहुल पवार हे आपल्या ताब्यातील एस.टी. भरधाव वेगाने चालवत मोबाईलवर देखील बोलत होते. अशी माहिती अपघातग्रस्त जखमी प्रवाशांनी दिली. याचबरोबर या एस.टी. चालकाने मद्य प्राशन केले असल्याचे देखील सांगितले जात होते, तशी घटनास्थळी देखील चर्चा होती. यामुळे या एस.टी. चालकाची मेडिकल तपासणी व्हावी, अशी मागणी कामथे उपजिल्हा रुग्णालयात लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे केली.