देवरूख महाविद्यालयात एचआयव्ही/एड्स जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांची समूह चर्चा

देवरूख (प्रतिनिधी)

आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या औचित्याने देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये- सप्रे-पित्रे महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एच. आय. व्ही./एड्स जनजागृती आणि समूह चर्चा’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाविद्यालयातील एकूण ३९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी एचआयव्ही/एड्सविषयी असलेले गैरसमज दूर करणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना, जनजागृती आणि समाजाची जबाबदारी या विषयांवर आपले विचार मांडले.

ग्रामीण रुग्णालय, देवरुख येथील आयसीटीसी समुपदेशक वैशाली पुजारी यांनी परीक्षक व मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावली. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना एचआयव्ही संसर्ग कशामुळे होतो, त्याचा प्रसार कसा टाळता येतो तसेच कोणती काळजी घ्यावी याबाबत शास्त्रीय व वस्तुनिष्ठ माहिती दिली. स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे:-
प्रथम: प्रणव वाजे(द्वितीय वर्ष, वाणिज्य), द्वितीय: फाल्गुनी फेपडे(द्वितीय वर्ष, वाणिज्य), तृतीय: वैभवी चव्हाण(द्वितीय वर्ष, वाणिज्य), उत्तेजनार्थ: वेदा आंबवकर(१२वी कला).

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रा. डॉ. सुनील सोनावणे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सुनील सोनवणे, प्रा.सीमा कोरे, प्रा. डॉ. मयुरेश राणे, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा. वसंत तावडे तसेच रेड रिबन क्लबच्या पदाधिकारी, स्वयंसेवक आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. प्रा. डॉ. प्रशांत नारगुडे यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांमध्ये एचआयव्ही/एड्सविषयी योग्य माहिती, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जनजागृतीची भावना निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.